लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या मोताळा येथील स्कूल बसच्या चालकाविरुध्द मोटार वाहन निरीक्षकांनी गुरुवारी दुपारी कारवाई केली. विद्यार्थ्यांना घरी पोहोचविण्यात आले असून स्कूल बस बोराखेडी पोलिस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली आहे.उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक एफ. एस. शेख गुरुवारी शासकिय कामानिमित्त जात होते. दरम्यान मोताळा येथे एम- एच -१२ - एफ- सी- ९४५५ क्रमांकाची स्कूलबस क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी घेऊन जातांना आढळली. सहकार विद्या मंदिरमधील विद्यार्थ्यांसाठी मोताळा येथील चालक देशमुख याने खासगी स्कूल लावलेली आहे. सदर बसला केवळ १७ विद्यार्थी बसविण्याची परवानगी आहे. मात्र स्कूलबसमध्ये ५१ विद्यार्थी अगदी कोंबून बसविलेले होते. चालकाची चौकशी केली असता त्याच्याकडे आवश्यक कागदपत्रे आढळली नाही. त्यामुळे स्कूल बस बोराखेडी पोलिस स्टेशनला लावण्यात आली आहे. चालकास मेमो देण्यात आला असून कागदपत्रांसह आरटीओ कार्यालयात बोलावण्यात आल्याचे मोटार वाहन निरीक्षक शेख यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी; स्कूल बसवर ‘आरटीओ’ ची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 2:45 PM