चिखली (बुलडाणा) : दुष्काळ व आगामी काळातील तीव्र पाणीटंचाईचे चित्र पाहता पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन होणे आवश्यक असताना अधिकार्यांच्या दूर्लक्षामुळे पेनटाकळी प्रकल्पातून कालव्याव्दारे सोडण्यात येणारे पाणी उचल पाण्याच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात सोडण्यात येत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. सद्यस्थितीत पेनटाकळी प्रकल्पातून कालव्याव्दारे सोडण्यात येणारे पाणी शेतकर्यांना शेतीला किती प्रमाणावर लागते याचे नियोजन करून योग्य प्रमाणात सोडणे आवश्यक आहे. परंतू तसे न करता पाणी सोडायचे म्हणून सोडल्या जात असल्याने कालव्यातील शिल्लक पाणी वाया जात आहे. सध्या वातावरणात गारवा असल्यामुळे पिकांना पाणी कमी प्रमाणात लागते मात्र याकडे अधिकार्यांचे साफ दूर्लक्ष असल्याचा आरोपही शेतकरी संघटनेने केला आहे. या हलगर्जीपणामुळे धरण साठय़ातून पाणी उचलून आपल्या पिक वाचविणार्यांना नंतर धरणात पाणी शिल्लक राहत नाही व पाण्यावाचून पिके वाया जातात, असेही शेतकरी संघटनेने म्हटले असून कालव्यातून सोडल्या जाणार्या पाण्याचे योग्य नियोजन करून पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, अशी मागणी पाटबंधारे विभागाकडे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर, रतीराम शेळके, राजु शेटे, मुरलीधर येवले यांनी केली आहे.
पेनटाकळीतून जास्त पाण्याचा विसर्ग
By admin | Published: December 25, 2014 11:59 PM