जिल्ह्यात सकाळी ७ ते ११ पर्यंत केवळ अत्यावश्यक सेवेसाठी सूट आहे; मात्र नागरिक सकाळी ११ वाजेनंतर विनाकारण फिरत आहेत. यासाेबतच शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांच्या मैदानांसह चिखली रोड, खामगाव रोड, मलकापूर रोड, जुना अजिसपूर रोड तसेच शहरातील काही प्रमुख मार्गांवर तसेच विविध परिसरातील ओपन स्पेसमध्ये माॅर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉकच्या नावाखाली नागरिकांचा मुक्त संचार सुरू आहे. संचारबंदी काळात सकाळी ७ ते ११ पर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी सूट देण्यात आली आहे. या सवलतीचा दुरुपयोग होत आहे. त्यामुळे शहरातील मैदाने तसेच रस्त्यावर फिरणाऱ्यांची गर्दी थांबता थांबत नाही. सर्वत्र फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असून, भाजी खरेदीच्या नावावर गर्दी होत आहे. संचारबंदीचे सर्व नियम पायदळी तुडविले जात आहेत.
पाेलिसांकडूनही सूट
मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक करणाऱ्यांविरुद्ध सुरुवातीला कारवाई करण्यात आली होती. मात्र आता पोलिसांकडूनही सूट मिळत असल्याने माॅर्निंग, इव्हिनिंग वाॅक सुरूच आहे. यासाेबतच नगरपालिकेच्या वतीने गठीत करण्यात आलेल्या पथकानेही कारवाईचा बडगा उचलत मॉर्निंग वाॅक करणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे.
खुली हवा नव्हे, कोरोनाचे विषाणू
कोरोना विषाणूचा प्रसार हवेतूनही होत असल्याचे समोर आल्यानंतर, या विषाणूला रोखण्यासाठी दोन मास्क वापरण्याचा उपाय समोर आला आहे. डबल मास्कमुळे ९५ टक्के संरक्षण मिळत असल्याने, नागरिकांनी एकावर एक असे दोन मास्क वापरावेत, असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे.
कोरोनाची भीती वाटत नाही का?
काेराेनाची भीती आहेच. तरी प्रकृती चांगली राहावी, यासाठी चालण्याचा व्यायाम करीत असताे. चालण्यामुळे प्रकृती बरी राहते, घरी किती वेळ थांबणार? बाहेर निघू नये, हे खरे आहे. मात्र मास्क लावून अंतर पाळून बाहेर फिरताे.
- रामेश्वर इंगळे.
सकाळ, संध्याकाळ चालण्याची सवय आहे. मागील लाॅकडाऊनमध्ये घरातच बंदिस्त हाेताे. आताही काेराेनाची भीती आहे. मात्र रूमाल बांधून थाेडा वेळासाठीच बाहेर फिरताे, पाेलिसांनी हटकले तर माघारी येताे.
- गजानन चव्हाण.