लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : तालुक्यातील बोरखेडी धरणात अत्यल्प पाणी साठा उपलब्ध असल्यामुळे जिल्हाधिका-यांच्या आदेशान्वये तलावातील सुरू असलेला अवैध पाणी उपसा बंद करण्याबाबत तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली होती. विद्युत पुरवठा खंडित केलेला असताना पाणी उपसा करणा-यावर नोव्हेंबर महिन्यात मोठी कारवाई करण्यात आली; मात्र मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा झाल्याने धरणात गाळच शिल्लक राहिला आहे. यामुळे शहरात भीषण पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे. ग्रामीण व शहरी भागात पाणी पुरवठा करणाºया अनेक जलाशयात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नोव्हेंबर २०१७ रोजी अवैध पाणी उपसा टाळता यावा, त्यानुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सन २०१६-१७ मध्ये तालुकानिहाय पथक स्थापन करण्यात आले होते. सदर पथकाने पाणी पुरवठा करणाºया जलाशयातील होत असलेला अवैध पाणी उपसा बंद करण्याच्या दृष्टीने विद्युत मोटारी जप्त करून वीज पुरवठा तोडण्याबाबत शीघ्र कारवाई करावी, असे आदेश असताना बोरखेडी धरणातून अवैध पाणी होत राहिल्याने नगर परिषद कार्यालयाने ६ डिसेंबर २०१६ रोजी लोणार तहसील कार्यालयात सदर अवैध पाणी उपसा थांबविण्यासाठी कारवाई करण्यात यावी, याबाबत पत्रव्यवहार केला होता; परंतु बोरखेडी धरणातील पाणी उपशावर प्रशासनाने तातडीने ठोस कारवाई न केल्यामुळे शहरवासियांना महिन्यातून केवळ दोन वेळा पाणी मिळत आहे. अनेक जलाशयांनी तळ गाठल्यामुळे प्रशासनाला टँकर सुरू करण्याशिवाय पर्याय उरला नाही.
नियोजनाचा अभावबोरखेडी धरणातील अत्यल्प पाणी साठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात यावा, असे जिल्हाधिकारी यांचे आदेश असताना उपलब्ध पाण्याचे नियोजन न केल्यामुळे लोणार शहराला भीषण पिण्याच्या पाण्याची टंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या नियोजनाअभावी हा प्रकार निर्माण झाल्याने शहरवासीयांमध्ये रोष निर्माण होत आहे.
शहरवासियांना पाणी टंचाईतून दिलासा देण्यासाठी लवकर बोअर अधिग्रहण करण्यात येतील. तसेच काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.- भूषण मापारी , नगराध्यक्ष, लोणार
चार गावांसाठी टँकर मंजूरबुलडाणा : सिंदखेड राजा तालुक्यातील किनगाव राजा, शेगाव तालुक्यातील गव्हाण व चिखली तालुक्यातील पळसखेड सपकाळ, धोडप येथील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता या चार गावांसाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. किनगाव राजा गावाची लोकसंख्या ५ हजार ५५० असून, येथे दोन टँकर दररोज एक लक्ष ४५ हजार लिटर पाणी पुरवठा करणार आहे, तसेच गव्हाण गावची लोकसंख्या १७०० असून, येथे एक टँकर मंजूर आहे. त्याचप्रमाणे चिखली तालुक्यातील पळसखेड सपकाळ गावची लोकसंख्या ७०० आहे. या गावासाठी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. धोडप येथील १६०० लोकसंख्येकरिता एक टँकर दररोज ३८ हजार लिटर पाण्याचा पुरवठा करणार आहे. या सर्व टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीला घेण्यात येणार असून, नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकाºयांनी करावी, निविदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत.