लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : येथील ब्रह्म एज्युकेशन व्हॅली या शाळेत आरोग्य विभागाने वाटप केलेल्या जंतनाशक गोळ्यांमुळे १५ चिमुकल्या विद्यार्थ्यांना मळमळ व पोटदुखीचा त्रास झाल्याची घटना गुरुवारी घडली. सदर विद्यार्थ्यांवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.आरोग्य विभागामार्फत लहान मुलांना जंतनाशक गोळ्या वाटप करणे सुरू असून, येथील ब्रह्म एज्युकेशन व्हॅली या शाळेतील सुमारे १५0 विद्यार्थ्यांना गुरुवारी जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. गोळ्या खाल्ल्यानंतर काही वेळाने येथील अन्वेशा संदीप तायडे, हर्षा राजेंद्र वानखेडे, कायनात अल्मस, अनुष्का श्रीकृष्ण किनगे, गुणिका प्रशांत कोल्हे, श्रावणी प्रशांत टेकाडे, नेहा सतीश नरवाडे, वैष्णवी सुनील लाहुडकर, वैभव अशोक मानकर, मो. फुरकान, प्रणव रामचंद्र जवरे, संदेश संतोष तायडे, प्रणव ज्ञानेश्वर साबे, मो. जोहेब शेख बिस्मिल्ला, वेदांत शेखर दोडे या दहा वर्षे वयोगटातील १५ विद्यार्थ्यांना मळमळ व पोटदुखीचा त्रास सुरू झाला. मुख्याध्यपक व शिक्षकांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पाटील व सहकार्यांनी या विद्यार्थ्यांवर उपचार केले. प्रकृती चांगली झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली.
विद्यार्थी हिताच्या दृष्टीने आमची शाळा शासनाच्या सर्व उपक्रमात सहकार्य करीत असते. जंतनाशक गोळ्या वाटपाच्या उपक्रमातही आम्ही सहकार्य केले. परंतु आमच्या शाळेतील जवळपास १५0 विद्यार्थ्यांपैकी १५ विद्यार्थ्यांना मळमळ व पोटदुखीचा त्रास का झाला, याची चौकशी करण्याची मागणी शाळा प्रशासन करीत आहे.-भारती ब्रह्मपुरीकर, मुख्याध्यापक, ब्रह्म एज्युकेशन व्हॅली, मोताळा.
जंतनाशक अलबेंडाझोल गोळ्यांमुळे या विद्यार्थ्यांना गॅस्ट्रीटिक व डिहायड्रेशनचा त्रास झाला असावा. जंतनाशक गोळी देताना बालकांनी भरपूर जेवण व भरपूर पाणी पिलेले असावे. सदर गोळी चावून खावी. जेणेकरून अशा प्रकारचा त्रास टाळल्यास मदत होईल. संबंधितांनी या बाबीची काळजी घ्यावी.- डॉ. अमोल पाटील, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, मोताळा