खामगाव: बहिणीशी तुलना करीत आई रागावल्याने खामगावातील एका उच्च शिक्षीत युवतीने घर सोडून थेट पुणे गाठले. मैत्रिणीच्या मदतीने पुण्यातील एका कंपनीत नोकरीही मिळविली. मुलगी स्वत:च्या भरवशावर करीअर करण्याच्या प्रयत्नात असतानाच, तिच्या आईने शहर पोलीसांत मुलगी हरविल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलीसांनी युवतीचा शोध घेऊन आई वडीलांच्या स्वाधीन केले.
संशय...समज...गैरसमजातून घडलेल्या या प्रकाराचा अखेर शुक्रवारी शेवट गोड झाला. बहिणीला नोकरी लागली. ती तिच्या पायावर उभी राहीली असे म्हणत आई रागावल्याने खामगावातील पूजा शशिकांत सातपुते या युवतीने थेट पुणे गाठले. मैत्रिणीच्या मदतीने खासगी नोकरीही मिळविली. वाघोली परिसरातील एका मुलींच्या वसतीगृहात राहून ड्युटीही सुरू केली. मात्र,इकडे मुलगी घरून निघून गेल्याने आई वडिल आणि नातेवाइकांकडून तिचा सर्वत्र शोधाशोध सुरू झाला. अशातच आईने मुलगी हरविल्याची तक्रारही पोलीसांत केली. या तक्रारीतून बरेच समज, गैरसमज आणि संशयही वाढीस लागले. दरम्यान, पोलीसांनी मोबाईल लोकेशन ट्रेस करून युवतीचा शोध लावला. ती पुणे येथे असल्याचे समजताच, नातेवाईकांच्या मदतीने तिला शुक्रवारी खामगाव येथे आणण्यात आले. मुलगी सुखरूप असल्याचे समजताच नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला. हकीकत समोर आल्यानंतर सर्व गैरसमज दूर झाले. मुलीचे बयाण नोंदवित शहर पोलीसांनी रागाच्या भरात निघून गेलेल्या पूजा शशिकांत सातपुते हिला शुक्रवारी दुपारी आई वडीलांच्या स्वाधीन केले.
पोलीसांची सकारात्मक भूमिका
मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या आईने नोंदविलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने खामगाव शहर पोलीस स्टेशनचे निरिक्षक शांतीकुमार पाटील यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनात एक पथक पुणे येथे रवाना केले. मोबाईल लोकेशनच्या आधारे मुलीचा शोध घेण्यात आला. शहर पोलीस स्टेशनचे पोकॉ भानुदास तायडे, पोकॉ आर.एम. थारकर यांनी सहकार नेते अशोक हटकर, पुरूषोत्तम देशमुख, निलेश कोळसे यांच्या मदतीने शुक्रवारी पूजाला परत आणले. यावेळी तिच्या पुणे येथील मैत्रिणींनी सकारात्मक प्रतिसाद देत, पोलीसांना मदत केली.