खामगाव : खेळता-खेळता अडीच वर्षाचा बालक विहिरीत पडला. त्याला वाचविण्यासाठी त्याच्या आईनेही विहिरीत उडी घेऊन मातृत्त्व दिनी मातृत्त्वाच्या या धाडसाची नवी गाथा समोर आली.या घटनेत आई व मुलाची प्रकृती धोक्याबाहेर आहे. ही घटना १२ मे रोजी सायंकाळी जळगाव जामोद तालुक्यातील कुरणगाड खुर्द येथे घडली. जळगाव जामोद तालुक्यातील कुरणगाड खुर्द येथील ज्ञानेश्वर ठाकरे (वय ३०) यांचा अडीच वर्षांचा मुलगा सार्थक हा रविवारी सायंकाळी घरासमोर खेळत होता. अचानक त्याचा तोल जावून तो घरासमोरीलच विहिरीत पडला. ही बाब त्याची आई दुर्गा (वय २३) हीच्या लक्षात आली. यावेळी तीने आरडा-ओरड करत बालकाला वाचविण्यासाठी विहिरीत उडी घेतली. यादरम्यान विहिरीतील विद्युत मोटारही खाली पडली. यामुळे बालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर बालकाची आई दुर्गा ही सुध्दा गंभीर जखमी झाली. परिसरातील नागरिकांनी दोघा माय-लेकांना विहिरीबाहेर काढले. यानंतर त्यांना जळगाव जामोद येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून खामगावला हलविण्यात आले. खामगाव येथे एका खासगी रूग्णालयात दोघांना दाखल करण्यात आल्यावर बालकाची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. सध्या सार्थकवर अकोला येथे तर दुर्गावर खामगाव येथे उपचार सुरू आहेत. दोघांच्याही प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मुलाला वाचविण्यासाठी आईने घेतली विहिरीत उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 3:03 PM