डोणगाव : ग्रामपंचायतीच्या जागेवर व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण न काढण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केली आहे. हे अतिक्रमण काढल्यास भाजपच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे अतिक्रमण काढू नये, अशी मागणी केली आहे. कोरोना महामारीमुळे ग्रामपंचायतीच्या जागेवर व्यापार करणारे व्यापारी हवालदिल झाले असून, ग्रामपंचायतीकडून त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे कोरोनाने हवालदिल झालेल्या एक हजार ते १,५०० अतिक्रमणधारक व्यापाऱ्यांची रोजीरोटी बंद होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते. या अनुषंगाने ग्रामपंचायत प्रशासनाने त्यांचा विचार करावा. त्यानंतरही ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाई केल्यास भारतीय जनता पक्ष जनआंदोलन उभारेल, असे निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन अर्जुनराव वानखेडे, सागर बाजड, विलास परमाळे, रोहित डागर, चंद्रकांत वाघमारे, अक्षय काळे, साजन शाह, अंकुश मोहळे, हरिश इंगळे, हुसेन गवई, सचिन मोरे, रोहित गवई, आदींनी दिले.
080921\new doc 2021-09-08 17.36.16_1.jpg
निवेदन देताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अर्जूनराव वानखेडे