बुलडाणा: जिल्ह्यात चाराटंचाई असताना तालुकास्तरावरून चारा छावणीसाठी एकही प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आला नाही. त्यामुळे गुरांवर उपासमारीची वेळ आली असून पशुपालकांची चिंता वाढली आहे. यासंदर्भात ७ मे रोजी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशीत करून चारा टंचाईचा प्रश्न उजेडात आणला असता, प्रशासनाकडून चारा छावणी सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. चारा छावणी सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थानी सामाजिक दृष्टीकोनातून पुढाकार घेत २० मे पर्यंत संबंधित तालुका स्तरीय समिती सदस्य, पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी (विस्तार), गटविकास अधिकारी, तहसिलदार व उपविभागीय अधिकारी तथा अध्यक्ष तालुकास्तरीय समिती यांचे अभिप्रायासह प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती शाखेत सादर करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भीषण चारा टंचाई जाणवत असेल, अशा गावात किंवा महसूल मंडळनिहाय चारा छावणी सुरू करता येते. शासन निर्णयान्वये संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, उद्देश पत्रिका, मागील तीन वर्षाचे आॅडीट रिपोर्ट, संस्थेच्या नावाचे पासबुक व त्याची झेरॉक्स, विद्युत पुरवठा उपलब्धेतचा वीज देयकाचा पुरावा, शेतात विहीर/बोअरवेल असल्याच्या सातबारााी नोंद, तलाठी, ग्रामसेवक यांचा दाखला, संस्थेकडे हिरवा किंवा कोरडा चारा उपलब्ध आहे किंवा कसे याबाबतचा संस्थेचा दाखला, संस्थेकडे चारा उपलब्ध नसल्यास चारा कसा, कोठून उपलब्ध करणार याचे नियोजन, चारा बाहेरून आणावयाचा असल्यास संस्था वाहतूक करण्यास सक्षम आहे काय, याबाबतचा पुरावा प्रस्तावासोबत असावा. पशुधनासाठी नियमित योजनेमधून उपलब्ध असलेला चारा तसेच अतिरिक्त चारा उपलब्ध होण्यासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत अतिरिक्त वैरण विकास कार्यक्रम व गाळपेर योजनेमधून उपलब्ध होणाºया चाºयाबाबत पशुसंवर्धन विभागाचा दाखला असावा, असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. चारा छावणीसाठी किमान २५० व कमाल ३ हजार जनावरे अनुज्ञेय असणार आहेत. प्रत्येक जनावराचे मालकास त्याच्याकडे असलेल्या एकूण मोठ्या व लहान जनावरांपैकी केवळ पाच जनावरे (लहान व मोठे) जनावरांच्या छावणीत दाखल करता येतील. छावणीत दाखल करावयाची जनावरे ही जनावराच्या मालकाच्या इच्छेनुसार, लेखी संमतीने व स्थानिक तलाठी यांचा दाखला प्राप्त झाल्यावरच दाखल करून घेता येतात, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मोठ्या जनावरास ९० व लहान जनावरास ४५ रुपये अनुदानछावणीतील प्रति मोठे जनावरास प्रतिदिन ९० रुपये व लहान जनावरास प्रतिदिन ४५ रुपये अनुदान मिळेल. छावणी चालकाचे १०० रूपयांचे स्टॅम्प पेपरवर सर्व अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करणे बंधनकारक राहणार आहे. यापूर्वीच्या कालावधीमध्ये ज्या चारा छावणीत प्रायोजक संस्थावर चारा छावणीमधील अनियमितते संदर्भात फौजदारी गुन्हे दाखल केलेले नसल्याचे पोलीस विभागाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.असे द्यावे लागणार खाद्यनिवारा शेड यासाठी आवश्यक असून रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाश व्यवस्था असावी. जनावरांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मोठ्या जनावराकरीता १८ किलो व लहान जनावरासाठी ९ किलो हिरवा चारा आणि आठवड्यातून तीन दिवस एक दिवस आडप्रमाणे मोठे जनावरास एक किलो व लहान जनावरास अर्धा किलो पशुखाद्य द्यावे लागेल.
चारा छावणी सुरू करण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 6:18 PM