- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: मुखाच्या आजारांमुळेच शारीरिक आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. जिल्ह्यात या मौखिक आरोग्यासाठी २६ जानेवारीपासून आरोग्यविभागाकडून चळवळ उभारण्यात आलेली आहे. दंत तपासणीसाठी विशेष पथकाची निर्मिती करण्यात आली असून मौखिक आरोग्याच्या दृष्टीने तपासणी व जागृतीची व्याप्ती वाढविण्याच्या हालचाली सध्या जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहेत. मौखिक आरोग्य बिघडण्यामागे तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण अधिक आहे. कॅन्सरचे निदान करण्यासाठी साधारणपणे ट्युमर ‘बायोप्सी’ केली जाते. रोगनिदान करण्यासाठी शरीरातील ऊतींना छेद घेऊन त्यांची सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने तपासणी करण्याची पद्धत म्हणजे बायोप्सी बुलडाणा जिल्ह्यात होत नाही; त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील रुग्णांच्या बायोप्सीचे हे निदान अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयाकडून करून घेतले जात आहे. ५ फेब्रुवारी रोजी असलेल्या मौखिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ही माहिती घेतली असता जिल्ह्यात मौखिक आरोग्याच्या दृष्टीने जागृती होत असल्याचे दिसून आले. अनेक व्यक्ती शारीरिक स्वच्छतेकडे गांभीर्याने पाहत नाहीत. धूम्रपान, तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा, अंमली पदार्थ, जंकफुडचे सेवन केले जाते. त्यामुळे मुखाचे विविध आजार उद्भवण्याचे प्रमाण वाढले आहे. मौखिक आरोग्यासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने २६ जानेवारीचा मुहूर्त साधून एक चळवळ हाती घेतली आहे. मौखिक आरोग्याच्यादृष्टीने २६ जानेवारीला जिल्हाभर तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आली. जिल्हाधिकाºयांपासून गावोगावी तंबाखू मुक्तीची प्रतीज्ञा घेतल्याचे दिसून आहे. त्यानंतर दंत तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये विशेष पथक निर्माण करण्यात आलेले आहे. मौखिक आरोग्याची जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने जिल्हा सामान्य रुग्णालयात नियोजन करण्यात येत असून लवकरच गावोगावी उद्बोधन वर्गही घेण्यात येणार आहेत. शासकीय दंत रुग्णालयाच्यावतीने दंत तपासणी शिबीरावरही भर दिल्या जाणार असल्याची माहिती आहे. दंत तपासणी शिबीरामध्ये मौखिक आरोग्याच्यादृष्टीने वेगवेगळे रुग्ण आढळून येत आहेत. प्रत्येक शिबीरामध्ये असे रुग्ण सापडतात. मागील महिन्यात बुलडाणा जिल्ह्यातील दोन रुग्ण तोंडाच्या कॅन्सरचे आढळून आले होते. त्यांची बायोप्सी अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविण्यात आली होती. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
वर्षभरात शिबीरांनी गाठले शतकग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत मौखिक आरोग्य अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. वर्षभरामध्ये १०० पेक्षा जास्त शिबीरांचे आयोजन आतापर्यंत करण्यात आले आहे. यामध्ये अनेक शाळांमध्येही अभियान राबविण्यात आले असून विद्यार्थ्यांना मौखिक आरोग्याची माहिती देऊन त्यांची तपासणी करण्यात आली आहे.
तीन अधिकाºयांची नियुक्तीमौखिक आरोग्याबाबतची सर्वस्तरीय उदासीनता आणि तंबाखुजन्य पदार्थांमुळे तरुणांमध्ये वाढलेले कॅन्सर व एकूणच खालावलेला आरोग्याचा दर्जा, या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मौखिक अभियान जिल्ह्यात सध्या सुरू आहे. या अभियानांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयात एक युनिट उभारण्यात आले आहे. त्यामध्ये नविन दंत शल्यचिकित्सक, दंत आरोग्यक व दंत सहाय्यक कार्यरत आहेत.
अनेकजण मौखिक आरोग्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. त्यामुळे मौखिक आरोग्याच्यादृष्टीने विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्यम दंत तपासणीसह मौखिक आरोग्यासाठी गावोगावी जनजागृती करण्यात येत आहे. काही दिवसात याची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. - डॉ. पी. बी. पंडित, जिल्हा शल्य चिकित्सक, बुलडाणा.
मौखिक आरोग्याचा ह्रदयाशी संबंध येतो. तर मधुमेहाच्या रुग्णांनाही याचा धोका असतो. मौखिक आरोग्याच्यादृष्टीने सध्या जिल्हाभर जागृती निर्माण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. मुखाच्या आजाराकडे रुग्णांनी दुर्लक्ष करू नये. - डॉ. आशिष गायकवाड, दंत शल्यचिकित्सक, बुलडाणा.