- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात गौण खनिजाचे खाणपट्टे मंजूर करण्यासाठी जिल्हा सर्वेक्षण अहवाल तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील गौण खनिजाबाबत व उपलब्ध रेती घाटाविषयीची माहिती गोळा करण्यात येत आहे. खाणपट्टे मान्यतेवर लवकरच निर्णय घेण्यात येणार असून, आता रेती घाट सुरू होण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.जिल्ह्यात अनेक दिवसांपासून रेती उत्खनन बंद आहे. रेती घाटांचा लिलाव न झाल्याने बांधकामावरही अवकळा आली आहे. दरम्यान, मराठवाड्यातून रेतीची वाहतूक जिल्ह्यात सुरू करण्यात आली. रेती घाटांचा लिलाव होत नसल्याने रेतीच्या अवैध वाहतूकीचे प्रमाण वाढले आहे. रेती वाहतूकीदरम्यान अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले, अधिकाऱ्यांना मिळणाºया धमक्या अशा गैरप्रकाराने जिल्ह्यातील रेती वाहतूक सध्या चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून रेतीच्या अवैध वाहतूकीने प्रशासनाचेही लक्ष वेधले आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या खनिकर्म विभागाकडून गौण खनिजाबाबत जिल्हा सर्वेक्षण अहवाल तयार करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत. नदीपात्रातील वाळू उत्खनन आणि लघु गौण खनिजाचे उत्खनन तसेच गौणखनिजाचे खाणपट्टे मंजूर करण्यासाठी जिल्हा सर्वेक्षण अहवाल तयार करणे आवश्यक आहे. केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा सर्वेक्षण अहवाल तयार करण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत. जिल्हा सर्वेक्षण अहवाल तयार करण्यासाठीचा लागणारा सर्व खर्च जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठानसाठी गठीत करण्यात आलेल्या विनियम परिषदेमध्ये मंजूर झाल्यानंतर दिल्या जाणार असल्याची माहिती आहे. हा अहवाल तयार करण्यात येत असल्याने जिल्ह्यात रेती उत्खनन सुरू होण्याचे संकेत निर्माण झाले आहेत. त्यामुळे अनेक दिवंसापासून प्रलंबीत असलेला रेती घटाचा प्रश्न आता मार्गी लागणार असल्याचे दिसून येते.
अहवालातील आवश्यक बाबीगौण खनिजबाबतच्या जिल्हा सर्वेक्षण अहवाल तयार करण्याच्या अनुषंगाने विविध प्रकारची माहिती गोळा करण्यात येत आहे. त्यामध्ये जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या खाणी, खाणीचे क्षेत्र, खाण समाप्ती कालावधी व खाणीची माहिती, मागील तीन वर्षात प्राप्त स्वॉमित्वधनाची माहिती, रेतीघाटापासून प्राप्त स्वॉमित्वधनाची माहिती, जिल्ह्यातील नदीतळात जमा होणाºया प्रक्रियेबाबत, जिल्ह्याच्या भौगोलिक रचनेची माहिती, पर्जन्यमानाबाबत माहेवार माहिती, जिल्ह्यात भुगर्भात प्राप्त होणाºया गौण खनिजाची माहिती आदी बाबींचा समावेश आहे.३ फेब्रुवारीची ‘डेडलाईन’गौण खनिजाचे उत्खनन करण्याकरीता खाणपट्टे मंजूर करण्यासाठी सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात येत आहे. या अहवालाकरीता पर्यावरणाशी व गौण खनिजाशी निगडीत मान्यताप्राप्त पर्यावरण सल्लागार असलेल्या तांत्रिक खाजगी व्यक्ती किंवा एजन्सीकडून दरपत्रक मागविण्यात आले आहे. जिल्हा खनिकर्म विभागाने हे दरपत्रक मागविले असून त्यासाठी ३ फेब्रुवारीची अंतीम मुदत देण्यात आली आहे.