बुलडाणा : गत दीड वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन शिक्षणपद्धतीने अध्यापनाचे कार्य सुरू होते; मात्र ऑनलाइन पद्धतीचा ग्रामीण भागात फज्जा उडाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाने नुकत्याच कोरोनामुक्त झालेल्या गावांतील आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या हालचाली स्थानिक प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्या आहेत.
दुसरीकडे, महाविद्यालये बंद असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी हा समजदार असून, कोरोनाविषयक नियमांचे पालन करू शकतो. त्यामुळे महाविद्यालये सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांमधून जोर धरत आहे.
कोरोना संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्व शाळा बंद आहेत; मात्र आता कोरोना रुग्णांची संख्या घसरत असल्याने विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. कोरोनामुक्त गावांत इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय नुकताच शासनाने घेतला असून, ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठराव घेऊन व पालकांच्या संमतीने हे वर्ग सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दुसरीकडे, शाळा सुरू होण्याच्या हालचाली वाढल्या; मात्र महाविद्यालये बंद असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा हिरमोड होत आहे. आता कोरोनाची परिस्थिती हळूहळू सावरायला सुरुवात झाली असून, शहरासह ग्रामीण भागातील महाविद्यालये सुरू करावीत, अशी मागणी होत आहे.
महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यास आमची तयारी पूर्ण झाली आहे. जर महाविद्यालये सुरू झाली, तर ५० टक्के उपस्थितीत वर्ग सुरू करणार आहोत. यामध्ये कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना एकत्र न बोलविता एकाचदिवशी एका शाखेतील विद्यार्थी बोलावून अध्यापन केले जाणार, असे नियोजन केले आहे, तसेच कॉलेजमधील ९९ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले आहे. शासनाने विचार करून अटी व शर्तींनुसार महाविद्यालये सुरू करावीत.
- डाॅ़ नीलेश गावंडे, प्राचार्य.
----------------------------------------
कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घ्यावा. महाविद्यालयीन विद्यार्थी हा १८ वर्षांवरील असल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांचे लसीकरणही झाले असणार. महाविद्यालये सुरू केल्यास तयारी पूर्ण झाली आहे. शासनाने अटी व शर्तींनुसार महाविद्यालये सुरू करावीत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
- डॉ. प्रशांत काेठे, प्राचार्य.
----------------------------
महाविद्यालये बंद असल्याने अभ्यासात खंड पडला आहे. ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांसह पालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. महाविद्यालये सुरू केल्यास एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. महाविद्यालये सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
- निकिता परिमल, विद्यार्थी.
महाविद्यालयांबाबत शासनाने त्वरित निर्णय घेऊन सुरू करावीत. बहुतांश महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, तसेच कोरोनाविषयक नियमांचे पालनही विद्यार्थी करणार आहेत. त्यामुळे शासनाने योग्य तो निर्णय घेऊन अटी व शर्तींनुसार महाविद्यालये सुरू करावीत.
- अभिषेक इंगळे, विद्यार्थी.