लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: लोणार सरोवर विकासासाठी प्राधिकरण स्थापण्याच्या दृष्टीने विचारमंथन सुरू असून नागपूर खंडपीठानेही त्यासंदर्भाने यंत्रणेला सूचित केले आहे. दरम्यान भोपाळ येथील स्कूल ऑफ प्लॅनिंग ॲन्ड आर्किटेक्टला विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने निधीची आवश्यकता आहे. नव वर्षात यासंदर्भातील कामे मार्गी लागण्याची आस यंत्रणेला आहे. सरलेले वर्ष कोरोना संसर्गाने व्यापून टाकले होते. त्याचाही फटका लोणार सरोवर विकास आराखड्याला बसला आहे. त्यामुळे सरलेल्या वर्षात सरोवर विकासाच्या दृष्टीने रखडलेली कामे नव वर्षात मार्गी लागण्याची चिन्हे आहे. दुसरीकडे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली लोणार सरोवर व परिसर विकासासाठी प्राधिकरण स्थापण्यात यावे, अशा सूचना खंडपीठाने यापूर्वी दिल्या आहेत. अनुषंगिक विषयान्वये जिल्हाधिकारी यांनी याबाबत अभिप्रायही मागविलेले आहेत. त्या अनुषंगाने आगामी काळात खंडपीठात माहिती सादर करण्यात येईल. प्राधिकरण स्थापन झाल्यास विकास आराखड्याच्या अंमलबजावणीस वेग येऊन थेट मंत्रालयीन स्तरावर सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांच्या संपर्कात यंत्रणा राहील व कामे मार्गी लागण्यास मदत मिळले, असे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. गुलाबी पाणी झाल्यामुळे लोणार सरोवर कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेदरम्यान चांगलेच चर्चेत आले होते. गेल्या वर्षी खंडपीठाच्या दोन न्यायमूर्तींनीही सरोवरास भेट देऊन एकंदर परिस्थितीची पाहणी केली होती. सोबतच लोणार सरोवराचे व्हीजन डॉक्युमेंटेशन करण्याच्या दृष्टीने तत्कालीन जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी बैठक घेऊन यंत्रणेला सूचना दिल्या होत्या. भोपाळ येथील स्कूल ऑफ प्लॅनिंग ॲन्ड आर्किटेक्टच्या प्राध्यापकांनीही फेब्रुवारी महिन्यात लोणार सरोवराची पाहणी केली होती. विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने भोपाळच्या या संस्थेला निधीची गरज आहे. त्या अनुषंगाने येत्या काळात प्रशासकीय पातळीवर हालचाली वेग घेतील असे लोणारचे तहसीलदार सैफन नदाफ यांनी सांगितले.
लोणार सरोवर विकासासाठी प्राधिकरण स्थापण्याच्या हालचाली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 11:09 AM
Lonar Sarovar News : भोपाळ येथील स्कूल ऑफ प्लॅनिंग ॲन्ड आर्किटेक्टच्या प्राध्यापकांनीही फेब्रुवारी महिन्यात लोणार सरोवराची पाहणी केली होती.
ठळक मुद्देविकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने निधीची आवश्यकता आहे. नव वर्षात यासंदर्भातील कामे मार्गी लागण्याची आस यंत्रणेला आहे.