नीलेश जोशी
बुलडाणा: जलसंवर्धनाच्या ‘बुलडाणा पॅटर्न’ची निती आयोगाने दखल घेतलेली असून आता अभ्यासाअंती देश पातळीवर हा पॅटर्न लागू करण्यासंदर्भात निती आयोग मार्गदर्शक सुचना जारी करण्याची शक्यता आहे. यासंदर्भाने निती आयोगाने बुलडाणा पॅटर्नचा सखोल अभ्यासही केला आहे. दरम्यान निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना एक पत्रही पाठवलेले आहे. या पत्रात प्रामुख्याने प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि मनरेगाच्या कामातंर्गतही बुलडाणा पॅटर्नचा समावेश करून याची व्याप्ती वाढविणे शक्य असल्याचे मत २३ जुलै रोजी निती आयोगाचे उपाध्यक्ष यांनी पाठविलेल्या पत्रात नमुद केले आहे. तसेच हा पॅटर्न सर्व राज्यात लागू करण्याच्या दृष्टीने काही मार्गदर्शक तत्वेही जाहीर करण्याच्या दृष्टीने निती आयोग सध्या काम करत असल्याचे त्यात म्हंटले आहे. दरम्यान, या पॅटर्नची व्याप्ती पाहता त्याच्या गुणात्मक अंमलबजावणीसाठी प्रशासकीय पातळीवर समन्वय गरजेचा आहे. प्रामुख्याने जलसंपदा विभागक, राष्ट्रीय महामार्ग आणि जिल्हाधिकारी कार्यालय या तीन यंत्रणात तो गरजेचा आहे. या उपक्रमातंर्गत गौणखनिज वापरण्यासंर्भातील परवानग्या आणि गौण खनिजाचा दर्जा हे मुद्देही महत्त्वाचे ठरत आहे. दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात हा प्रयोग बऱ्यापैकी यशस्वी झाल्यानंतर मध्यप्रदेशातही त्यानुषंगाने काम करण्यात येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. तसेच ग्रामीण रस्त्यापासून ते रेल्वेच्या कामामध्येही या पॅटर्नची उपयुक्तता महत्त्वाची ठरू शकते, असा अंदाज आहे. त्यातच राष्ट्रीय महामार्गची कामे करताना कालमर्यादेत ती पूर्ण करणे आवश्यक असते. त्यामुळे ही कामे करताना कंत्राटदारही फारकाळ थांबत नाही. त्यामुळेच जिल्हास्तरावर पॅटर्नच्या अमलबजावणीसंदर्भाने तथा परवानग्यासंदर्भात एककेंद्रीत यंत्रणेचीही गरज आहे.