बुलढाणा : दहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र चेस लीगच्या पाचव्या सिझनचे यंदा जूनमध्ये आयोजन करण्याच्या दृष्टीने मंथन सुरू आहे. काही तांत्रिक अडचणी तथा कोरोनामुळे मधल्या काळात ही स्पर्धा होऊ शकली नव्हती; परंतु यंदा या स्पर्धेच्या नियोजनाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. फिडे मानांकन १७ वर्षांखालील मुला-मुलींच्या राज्यस्तरीय स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमासाठी ते १६ एप्रिल रोजी बुलढाण्यात आले होते.
त्यावेळी त्यांनी उपरोक्त संकेत दिले. रशियाला मागे टाकून जागतिकस्तरावर भारत दुसऱ्या स्थानी झेपावला आहे. त्यासंदर्भाने बोलताना त्यांनी देशातील व राज्यातील या खेळातील गुणवत्ता हेरून काढण्यासाठी महाराष्ट्र चेस लीग सारखी स्पर्धा उपयुक्त ठरू शकते, असे स्पष्ट केले. महाराष्ट्र चेस लीग स्पर्धा त्यानुषंगानेच सुरू करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. परंतु मधल्या काळात ती होऊ शकली नव्हती; परंतु बुलढाण्यातील उत्कृष्ट आयोजन पाहता महाराष्ट्र चेस लीगचा पाचवा सिझन यंदा घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीयस्तरावर विचार करता जागतिक स्तरावर ज्या पद्धतीने रशियाचा दबदबा राहिलेला आहे त्याच पद्धतीने राष्ट्रीयस्तरावर तामिळनाडूने आपले एक वलय निर्माण केलेले आहे. उत्कृष्ट स्पर्धा आयोजन व तामिळनाडू शासनाचे क्रीडा क्षेत्राला मिळणारे प्रोत्साहन तसेच रोख स्वरूपात मिळणारी बक्षिसे पाहता तामिळनाडू ही बुद्धिबळ क्रीडा प्रकारातील देशातील महाशक्ती असल्याचे ते म्हणाले. एकट्या तामिळनाडूमध्ये ३० ग्रँडमास्टर आहेत, तर महाराष्ट्रात ११ ग्रँडमास्ट व पाच महिला ग्रँडमास्टर आहेत. एकंदर परिस्थिती पाहता महाराष्ट्राचाही या क्षेत्रातील दबदबा वाढविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र चेस लीगसारख्या स्पर्धा उपयुक्त ठरू शकतात, असे ते म्हणाले. त्यासाठी राज्य शासनाकडूनही योग्य पद्धतीने पाठबळ मिळणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
राष्ट्रीयस्तरावरील १५ टॉपर होतात सहभागीआजपर्यंत झालेल्या चारही महाराष्ट्र चेस लीग स्पर्धेत राष्ट्रीयस्तरावरील १५ टॉपर सहभागी होत आलेले आहेत. यात प्रामुख्याने कोनेरू हम्पी, सूर्यशेखर गांगुली, नारायण श्रीनाथ, विदीश गुजरातील शशिकिरण, आदिबनसह अन्य गुणवान खेळाडू सहभागी होत असतात. ठाणे, नगर, जळगाव, पुणे, सांगली, मुंबईकडून हे खेळाडू खेळतात. दोन ग्रँडमास्टर, आंतरराष्ट्रीय मानांकन असलेले दोन खेळाडू, दोन महिला खेळाडू आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी दोन खेळाडू संघात अनिवार्य असतात.
यंदा विदर्भाचाही सहभाग वाढावाबुलढाण्यात आयोजित राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमुळे विदर्भातही एक चांगले वातावरण या खेळाबाबत निर्माण होऊ शकते. यापूर्वीच्या एका लीगमध्ये नागपूरचा सहभाग होता. बुलढाण्यातील या स्पर्धेच्या रूपाने पुन्हा एकदा विदर्भाचा सहभाग वाढावा, अशी अपेक्षाही ग्रँड मास्टर अभिजित कुंटे यांनी यावेळी व्यक्त केली.