दरम्यान, समृद्धी महामार्गामुळे या भागात औद्योगिक विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सिंदखेडराजा तालुक्यातील सावरगाव माळ परिसरात आणि मेहकर तालुक्यातील साब्रा या दोन ठिकाणी जिल्ह्यात नवनगरे प्रस्तावित आहेत. त्यांच्या कामांनाही आता वेग देण्याची गरज निर्माण झाली आहे. दुसरीकडे अनुषंगिक प्रस्ताव अंतिम स्वरूपात आल्यानंतर राज्यातील फार्मा कंपन्यांनाही येथे येण्याबाबत आमंत्रण दिले जाणार असल्याची माहिती आहे. सोबतच या कंपन्यांसाठी काही जागाही येथे राखीव ठेवली जाऊ शकते, असे प्रयत्न प्रशासकीय तथा राजकीय पातळीवर सध्या सुरू झाले असल्याची माहिती आहे.
दुसरीकडे मेहकर तालुक्यातील साब्रा येथे प्रस्तावित नवनगरही विकसित करण्याचे नियोजन असून, मेहकर तालुक्याच्या क्षेत्रफळापैकी १६ टक्के क्षेत्र सिंचनाखाली असल्याने येथेही कृषीवर आधारित उद्योग उभारण्यास वाव आहे. त्यासंदर्भानेही आता प्रशासकीय तथा राजकीय पातळीवर इच्छाशक्ती दाखविण्याची गरज आहे.
एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांसोबतही चर्चा
या विषयाच्या अनुषंगाने एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांशीही पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे चर्चा करणार आहेत. त्यानंतर यासंदर्भातील प्रस्तावास अंतिम स्वरूप दिले जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. दुसरीकडे ३० मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या बैठकीमध्येही या प्रस्तावावर प्रसंगी चर्चा होण्याची शक्यता आहे.