सिंदखेडराजा : जिजामाता सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून राज्याचे आरोग्यमंत्री तथा समर्थ सहकारी साखर कारखाना (जालना) चे चेअरमन राजेश टोपे यांनी सोमवारी पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यासमवेत कारखान्याची पाहणी केली.
१९७२ मध्ये आप्पासाहेब देशमुख यांनी उजाड माळरानावर हा कारखाना सुरू केला. त्याकाळी केवळ चार कोटी रुपयांत हा कारखाना सुरू झाला. एक-दोन वर्षे कारखाना सुरू राहिला, नंतर ११ वर्षे हा कारखाना केंद्र सरकारनियुक्त प्रशासकाच्या ताब्यात होता. त्यानंतर १९९८ मध्ये राजेंद्र शिंगणे हे चेअरमन झाले. त्यानंतर त्यांनी २०११ पर्यंत हा कारखाना यशस्वीपणे चालविला. पण त्यानंतर बंद पडलेला कारखाना पुन्हा २०११ मध्ये विक्री केला गेला. जालन्यातील उद्योजक विनय कोठारी यांनी हा कारखाना घेतला होता. परंतु अनेक तांत्रिक अडचणी आल्याने त्यांनीही कारखान्यापासून काडीमोड घेणेच पसंत केले. मध्यंतरी बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक कारखाना घेणार, अशी अपेक्षा होती. पण कालांतराने ती अपेक्षाही मालवत गेली.
जवळपास ५० वर्षे जुना साखर कारखाना आता सुरूच होणार नाही, अशी शक्यता असताना, पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी हा कारखाना सुरू करणार असल्याचे संकेत दिले आणि त्यासाठी प्रयत्न सुरू केले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही हा कारखाना पाहण्यासाठी डॉ. शिंगणे यांनी निमंत्रण दिले होते. परंतु त्यावेळी त्यांचे येणे झाले नाही. सोमवारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी डॉ. शिंगणे यांच्या विनंतीला मान देऊन कारखान्याची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत समर्थ साखर कारखान्याचा टेक्निकल स्टाफ होता. कारखान्याची पाहणी करून त्यांनी टेक्निकल टीमला संपूर्ण पाहणी करून अहवाल देण्यास सांगितले असून लवकरच यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल, असे टोपे यांनी कारखाना परिसरात झालेल्या सत्कारप्रसंगी सांगितले.
जिजामाता कारखाना सुरूच व्हावा, ही या भागातील शेतकऱ्यांनी इच्छा आहे. कारखाना सुरू झाला तेव्हा विपरित परिस्थिती होती. मात्र आता रस्ते, वीज, पाणी या सुविधा मुबलक प्रमाणात या भागात उपलब्ध आहेत, ऊस देखील मोठ्या प्रमाणावर लागवड करण्याची शेतकऱ्यांची तयारी आहे. अशा परिस्थितीत टोपे यांनी हा कारखाना ताब्यात घेऊन सुरू करावा, अशी आग्रही मागणी यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केली.
यावेळी ॲड. नाझरे काजी, इरफान आली, विलास देशमुख, गजानन देशमुख, टेक्निकल स्टाफचे सुरुवसे, कामगार नेते व कारखाना माहीत असलेले काही जुने कामगार उपस्थित होते.
गाळप क्षमता कमी असलेला कारखाना
५० वर्षे जुना असलेला हा कारखाना गाळप क्षमतेत मात्र आताच्या कारखान्यांपेक्षा कमी क्षमतेचा आहे. तांत्रिकदृष्ट्या सोळाशे टन क्षमता असलेला हा कारखाना सुरू झाल्यास बाराशे टन उसाचे गाळप करू शकणार आहे. त्यामुळे यात मोठे बदल गरजेचे असून त्याची माहिती टोपे यांनी करून घेतली.
२५ कोटींचे देणे
कारखान्यावर सध्या विविध हेडखाली २५ कोटी रुपयांची देणी देणे आहे. दरम्यानच्या काळात कामगारांचे थकीत पगार, पीएफ ही देणी दिली गेली असली तरीही, अन्य विषयांचे २५ कोटी कारखान्याला देणे आहे. सध्या हा कारखाना राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात आहे.