साखरखेर्डा हे गाव तालुक्याचे मुख्यालय व कोविड सेंटर असलेल्या सिंदखेडराजा येथून सुमारे ५५ किमी अंतरावर आहे. सध्याची वाढती कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता आणि २३ गावांत वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत कोरोनाने मृत्यू झाल्याचा प्रकार दररोज समोर येत आहे. कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण होम क्वारंटाईन झाला, तर घरातील इतर व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून येत आहेत. महिला भीतीपोटी आजार लपविण्याचा प्रयत्न करीत असल्याने संसर्ग वाढत आहे. कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण कोविड सेंटरमध्ये दाखल करून त्यावर योग्य उपचार झाले, तर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मदत होईल. त्या अनुषंगाने साखरखेर्डा येथे कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी जि. प. सदस्य राम जाधव, सरपंच दाऊद कुरेशी, प्राथ. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सुरुशे, सुनील जगताप, ग्रा. पं. सदस्य सय्यद रफिक यांनी मतदारसंघाचे आमदार तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याशी संपर्क साधून केली. त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर श्री. म. जगद्गुरू पलसिद्ध संस्थानचे उत्तराधिकारी मठाधिपती नीळकंठ स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पलसिद्ध संस्थानने नव्याने उभारलेल्या भक्त निवास इमारतीची कोविड सेंटरच्या उभारणीसाठी पाहणी केली.
त्यावेळी नव्या इमारतीमध्ये सर्वसामान्य रुग्णांसाठी १५, तर ऑक्सिजन आवश्यक असलेल्या रुग्णांसाठी दहा अशा एकूण पंचवीस बेडची मांडणी केली जाऊ शकते. तेथे शौचालय, स्नानगृह, आदी इतर सोयी सुविधाही चांगल्या प्रकारच्या आहेत. तसेच रुग्णांना संपर्कासाठी मेहकर मार्गावरून रस्ता आहे. त्यामुळे रुग्णांचा व तेथील इतर संबंधितांचा जनतेशी संपर्क होऊ शकणार नाही. त्यामुळे ही इमारत कोविड सेंटर उभारण्यासाठी योग्य असल्याचे एकमत झाले आहे.