मोपलवार यांनी बुधवारी सिंदखेड राजा येथील समृद्धी महामार्गावरील इंटरचेंज व तढेगाव येथील कॅम्पला भेट दिली. २८ नोव्हेंबरपर्यंत समृद्धी महामार्गाचे नागपूर ते शिर्डी महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात असून, याच अनुषंगाने त्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील कामांचा आढावा घेतला. सध्या राहेरी येथील जुना पूल अवजड वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे सिंदखेड राजा ते दुसरबीड या भागातील बस वाहतुकीसह अनेक व्यवसायांना फटका बसला आहे. राहेरी पुलावरून तात्पुरत्या स्वरुपात वाहतूक सुरू करता येते का? याची चाचपणी करून येत्या काही दिवसांत हा पूल सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. सध्या राहेरी येथे वळण रस्त्यासह त्यावरील नव्या पुलाचे काम सुरू आहे. पुढील दोन महिने हे काम पूर्ण होऊ शकणार नाही. या दरम्यानच्या काळात राहेरी येथील जुन्या पुलाची दुरुस्ती करून तो सुरू झाल्यास या भागातील व्यवसायांना गती मिळू शकते. तथा वाहतुकीचा अन्य मार्गावर वाढलेला दबाव कमी होईल, तसेच वाहतुकीच्या अवाजवी खर्चातही बचत होईल.
जालना-नागपूर हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पूर्वीच वर्ग करण्यात आला आहे. परंतु, राहेरी येथील नव्याने उभारण्यात येणाऱ्या पुलाचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आलेले आहे. यातच रस्ते विकास महामंडळाने या कामातील दिरंगाई ओळखून जुन्या पुलाच्या डागडुजीविषयी निर्णय घेतल्याने या भागात समाधान व्यक्त होत आहे.
बुधवारी या पुलाची पाहणी करताना मोपलवार यांच्यासमवेत समृद्धी महामार्गाचे जालना व बुलडाण्याचे कार्यकारी अभियंता खलसे, समृद्धीचे कंत्राटदार कंपनीचे अधिकारी धरमबीर पांडे, एसडीअेा सुभाष दळवी, तहसीलदार सुनील सावंत यांची यावेळी उपस्थिती होती.