चिखली : वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसाने २९ मे रोजी शहर व तालुक्यात मोठे नुकसान केले. यामध्ये प्रमुख्याने पडझड झाल्याने मोठ्या प्रमाणावर विजेच्या तारा तुटल्या, अनेक ठिकाणी विद्युत खांबसुद्धा पडले. परिणामी वीजपुरवठा खंडित झाला होता. अशा स्थितीतही रात्रभर जागून वीजपुरवठा सुरळीत करून नागरिकांना दिलासा देण्याचे काम येथील महावितरणचे कनिष्ठ अभियंता अरुण भुसारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केल्याने त्यांच्या कार्याप्रती चिखलीकरांकडून कृतज्ञता व्यक्त होत आहे.
चिखली शहर व परिसरात २९ मे ला वादळी वारा व पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. शहरातील माळीपुरा येथील भराडमळा येथे १५० वर्षे जुने पिंपळाचे झाड तसेच श्री शिवाजी विद्यालय व महामार्गावरील अनेक मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले. अनेक घरांची पडझड झाली. टीनपत्रे उडाले. उन्मळून पडलेल्या झाडांखाली ट्रॅक्टर, कार, दुचाकी चक्काचूर झाल्या. यामध्ये प्रामुख्याने सर्वाधिक फटका महावितरणला बसला. पडझडीमुळे अनेक ठिकाणच्या विजेच्या तारा तुटल्या. अवचार मळा, संभाजीनगर, पुंडलिक नगरसह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर विद्युत खांब पडल्याने विद्युत पुरवठा ठप्प पडला होता. या विपरीत परिस्थितीत महावितरणचे अभियंता अरुण भुसारी यांच्या नेतृत्वात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाऊस व वारा थांबल्याच्या क्षणापासून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. सायंकाळी सहा वाजल्यापासून भल्या पहाटे चार वाजेपर्यंत अथक परिश्रमाअंती शहरातील काही भागात रात्री दोन वाजेच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत करून दिल्याने असह्य झालेला रात्रीचा उकाडा व डासांच्या त्रासातून चिखलीकरांची सुटका होऊ शकली. दरम्यान, स्वत: व सर्व कर्मचाऱ्यांनी रात्रभर जागल्यानंतर ३० मे रोजी दुसऱ्या दिवशीदेखील दिवसभर प्रचंड मेहनत घेत विजेच्या समस्या सोडविण्यात व्यस्त होते. त्यांच्या कार्याची दखल घेत चिखलीकर देखील समाजमाध्यमांद्वारे अभियंता भुसारी व महावितरणच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत आहेत.
कार्यतत्पर अधिकाऱ्यांची दखल !
कार्यतत्पर अधिकाऱ्यांना डोक्यावर घेऊन मिरवितानाच कर्तव्यात कसूर करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देणे, ही चिखलीकरांची परंपराच आहे. यापूर्वी गणेशोत्सवादरम्यानच गणेशाची चांदीची मूर्ती चोरणाऱ्यांचा तातडीने शोध घेणारे तत्कालीन ठाणेदार तथा मलकापूरचे विद्यमान उपविभागीय अधिकारी डी. बी. तडवी, तसेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यांचा तातडीने शोध घेऊन आरोपींना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचविणारे सध्याचे ठाणेदार गुलाबराव वाघ, तत्कालीन तहसीलदार व वर्ध्याचे विद्यमान उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे या व इतर अनेक कार्यतत्पर अधिकाऱ्यांच्या कार्याचा चिखलीकरांनी कायम गौरव केला आहे. याचीच पुनरावृत्ती सद्य:स्थितीत अभियंता भुसारी यांच्या माध्यमातून होताना दिसून येत आहे.