बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाबरोबरच म्युकरमायकोसिसही परतीच्या मार्गावर आहे. जिल्ह्यातील दाेघांवर शस्त्रक्रिया करण्यात आली हाेती. दुसरीकडे आतापर्यंत चार रुग्णांचा मृत्यू, तर ४३ जणांनी या आजारावर मात केली आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या घटत आहे. सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. कोरोनावर मात केल्यानंतरही बुरशीमुळे होणारा आजार अर्थात म्युकरमायकोसिसचे रुग्ण जिल्ह्यात आढळून येत आहेत. मुख, दात, डोळ्यांवर आणि मेंदूवर आघात करणाऱ्या या आजारावर वेळीच उपचार न मिळाल्यास जीवावरही बेतू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे ५८ रुग्ण आढळले. यापैकी चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर ४३ जणांनी या आजारावर मात केली. सध्या १५ जणांवर उपचार सुरू आहेत. अलीकडच्या काळात म्युकरमायकोसिसचे रुग्णही कमी संख्येने आढळून येत असल्याने म्युकरमायकोसिस परतीच्या मार्गाला लागल्याचे दिसून येते. कोरोनातून बरे झाल्यानंतर रुग्णांनी काही दिवस तरी स्वत:ची अधिक काळजी घेतली पाहिजे. कोरोनातून सुटलो म्हणजे बचावलो, असे समजून गाफील राहू नका, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी रुग्णांना दिला आहे.
अशी आहेत म्युकरमायकोसिसची लक्षणे
म्युकरमायकोसिस हा बुरशीमुळे होणारा आजार आहे. कोरोनामुक्त रुग्णांमध्ये हा आजार आढळून येतो. ही बुरशी सर्वप्रथम नाका - तोंडातून शरीरात प्रवेश करते. यातून संसर्ग झाल्यानंतर रुग्णाला आधी सर्दी होऊ शकते. नाकाला व घशात सूज येऊन वेदना जाणवू लागतात. ताप व सायनोसायटिससारखा त्रास झाल्यामुळे डोकेदुखी सुरू होते. हिरड्यांवर सूज, पक्के दात अचानक पडणे, गाल बधीर वाटणे, अशी लक्षणे दिसून येतात.
गाल, डोळे व दात दुखणे. असह्य डोकेदुखी, नाक, टाळूला बुरशीचा काळा चट्टा, चेहऱ्याच्या हाडाला असह्य वेदना होणे, डोळे लाल होणे, दृष्टी कमी होणे, नाकातून रक्त येणे, ही लक्षणे आहेत. योग्य निदान व उपाययोजना झाल्यास वेळीच या जंतूंचा फैलाव थांबू शकतो.
जिल्ह्यात औषधांचा साठा उपलब्ध
सुरुवातीच्या काळात जिल्ह्यात म्युकरमायकोसिस या आजारावरील औषधे उपलब्ध नसल्याने रुग्ण व नातेवाईकांना अकोला, नागपूर येथून औषधे आणावी लागली. काही रुग्णांनी तर अकोला, नागपूर, औरंगाबाद येथे जाऊन उपचार घेतले. लिपोसोमल एम्फोटिसिरीन बी इंजेक्शन, पोसोकोनाझोल टॅब्लेट यांसह अन्य औषधांचा जिल्ह्यात सुरुवातीला प्रचंड तुटवडा होता. आता जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात औषधांचा साठा उपलब्ध आहे. रुग्णांच्या गरजेनुसार औषधसाठा उपलब्ध हाेताे.
१५ जणांवर उपचार सुरू
जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकाेसिसचे ५८ रुग्ण आढळलेले आहेत. त्यापैकी १५ रुग्णांवर उपचार सुरू असून, ४३ जणांनी म्युकरमायकाेसिसवर मात केली आहे, तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात ८, स्त्री रुग्णालयात ३, खामगाव येथे एक आणि तीन रुग्णांवर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत.
कोट बॉक्स
म्युकरमायकाेसिस हा आजार पूर्णपणे बरा हाेणारा आहे. त्यामुळे रुग्णांनी वेळीच तपासणी केल्यास उपचाराने त्यावर मात करता येते. म्युकरमाकाेसिसची लक्षणे दिसताच डाॅक्टरांना दाखवावे. दुखणे अंगावर काढू नये. जिल्ह्यात एकूण ५८ रुग्ण आढळले असून, १५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- डॉ. नितीन तडस, जिल्हा शल्यचिकित्सक, बुलडाणा
.......
ही घ्या काळजी
आजारापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. जबडा, दात यांची नियमित स्वच्छता, बिटाडिन किंवा गरम पाण्याने गुळण्या कराव्यात. मधुमेहावर नियंत्रण ठेवल्यास संसर्गाचा धोका टळतो, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आहार, आराम, जीवनसत्त्वांचे सेवन करावे, असा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे़