लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : रस्ता नादुरुस्त असल्याने व पावसाळ्यामुळे रस्त्यात चिखल होत असून, विद्यार्थ्यांना चिखल तुडवत शाळेत जावे लागत आहे, तर काही शेतकऱ्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूस काट्या लावल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडचणी निर्माण होत आहेत. विद्यार्थ्यांसाठी रस्त्याची सुविधा करून द्यावी, अशी मागणी खानापूर येथील पालकांनी तहसीलदार संतोष काकडे यांच्याकडे ३ जुलै रोजी केली आहे.खानापूर येथील विद्यार्थ्यांना १ कि.मी. अंतरावर शाळेत जावे लागते. शाळेत जाण्यासाठी असलेल्या रस्त्यात चिखल होतो. पायी चालण्यासाठी विद्यार्थ्यांना चिखल तुडवत शाळेत जावे लागते, तर रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या शेतमालकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूस काट्या लावल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाताना तारेवरची कसरत करावी लागते. महसूल विभागाने सदर रस्त्याची दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना सुविधा द्यावी, अशी मागणी खानापूर येथील पंजाब मैराळ, सविता घुगे, गणेश अढाव, बाबुराव भाकडे, श्रीकिसन डहाळे, कमल भाकडे, भागवत भगत, प्रताप घुगे, जनार्दन भगत, कल्पना सरदार, अशोक नवलेसह पालकांनी केली आहे.