- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा : भारतात संत तुकाराम महाराजांनी सुमारे चारशे वर्षापूर्वी समाजाला साद घातली ‘‘वृक्षवल्ली वनचरे आम्हा सोयरी, पक्षीही सुस्वरे आळविती’’ आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजाला दिला. अशाच काही पर्यावरण संवर्धक संताचा उपदेश जोपासत श्री क्षेत्र मुक्ताबाईनगर ते श्री क्षेत्र पंढरपूरची वारी विठोबाच्या ओढीने निघालेली आहे. संत मुक्ताबाईची पालखी ‘निर्मल वारी, हरीत वारी’चा संदेश देत पंढरपूरच्या विठ्ठलाला पावलो पावली जवळ करत आहे. वारकरी संप्रदायामध्ये अनेक पर्यावरण संवर्धक संत आजपर्यंत झाले आहेत. त्यामध्ये संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत कबीर, संत सावतामाळी, संत चोखामेळा अशी समस्त संतांची मांदियाळी समाजाला अभंगाद्वारे निसर्गावर प्रेम करायला शिकवते. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ अशा अभंगातून मनमोहक अशा निसर्गात ईश्वराची अनुभूती घेता येते. संत परंपरेच्या संस्कृतीमुळेच पर्यावरणाचे संवर्धन आजपर्यंत झाले आहे. परंतू काही वर्षापासून वाढती वृक्षतोड, प्लास्टिक वापराचा अतिरेक, पर्यावरणात मनाचावाचा हस्तक्षेप यासारख्या अनेक कारणांमुळे पर्यावरण धोक्यात सापडले आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धक संताचा उपदेश जोपासण्याचे कार्य जळगाव जिल्ह्यातील श्री संत मुक्ताबाई संस्थानने हाती घेतले आहे. ‘‘पंढरीची वारी आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थव्रत’’ या संत तुकाराम महाराजाच्या अभंगातून वारीचे महत्व सांगितले जाते. आज एकविसाव्या शतकात या वारीचे स्वरूप बदलले आहे. सामाजिक प्रश्नांची जागृतीदेखील वारीतून होत आहे. ३०९ वर्षांपासून सुरू असलेल्या संत मुक्ताबाईच्या पालखीतून यावर्षी पहिल्यांदाच पर्यावरण संवर्धक संताचा उपदेश जपत आपल्या वारीलाच ‘निर्मल वारी, हरीत वारी’ असे ब्रीद दिले आहे. पर्यावरण संवर्धन जागृती करणाºया संत मुक्ताबार्इंच्या पालखी सोहळ्यात प्लास्टिक वापर पूर्णपणे टाळण्यात आला आहे. त्याचबरोबर पालखीमध्ये सहभागी वारकºयांना पत्रवाळी, द्रोण, ग्लास किंवा इतर कुठल्याच प्लास्टिकच्या वस्तू वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे जेवणाकरीता वारकºयांनी स्वत: ची ताट, वाटी, ग्लास सोबत आणलेली आहे. पंढरपूरमध्ये सुद्धा पंगतीमध्ये पत्रवाळी मिळणार नाही अशा सुचना, पालखी सोहळ्याच्या मंडळीकडून देण्यात आल्या आहेत. संत मुक्ताबार्इंची पालखी मुक्ताईनगर येथून श्री क्षेत्र पंढरपूरसाठी १८ जूनपासून निघाली आहे. पालखीमध्ये पर्यावरणाचा संदेश देणारी, कीर्तने, भारुडे, पोवाडे सुरू असतात. पालखी मार्गावर मुक्कामाच्या ठिकाणी वारकºयांकडून वृक्षारोपणही करण्यात येत आहे. पालखी निघण्याच्या एक महिनापूर्वीच संत मुक्ताबाई संस्थानचे विश्वस्त मंडळ, सोहळा प्रमुख, कीर्तनकार यांची बैठक घेवून निर्मल वारी हरीत वारी काढण्यावर निर्णय घेण्यात आला होता. .
वारकºयांना होता झाडांचा आश्रय
श्री संत मुक्ताबार्इंची पालखी जळगाव, बुलडाणा, जलना, बीड या मार्गे पंढरपूरला जाते. परंतू या मार्गावर पूर्वी मोठ्याप्रमाणावर वड, पिंपळ यासारखे सावली देणारे डोलदार वृक्ष होते. पाऊस किंवा ऊन असताना या डोलदार वृक्षांचा चांगला आश्रम वारकºयांना होत होता. मात्र आता ही वृक्षच नष्ट झाल्याने वारकºयांचा पालखी मार्गावरील आश्रय हरवला आहे. त्यामुळे यावर्षी ‘निर्मल वारी, हरीत वारी’चा उपक्रम संत मुक्ताबाईच्या पालखीने स्विकारला असून मुक्ताईनगर येथे वृक्षारोपण करूनच या वारीने पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे.
पाच भौगोलीक प्रदेशातून जाणारी पालखी
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील श्री संत मुक्ताबाई संस्थानची पालखी पाच भौगोलीक प्रदेशातून जाते. त्यामध्ये विदर्भ, मराठवाडा, खांदेश, मध्यप्रदेश आणि पश्चिम महाराष्ट्र अशा पाच भौगोलीक प्रदेशाचा समावेश आहे. यामध्ये यावर्षी ६५० महिला व ४५० पुरूष असे एकूण एक हजार १०० वारकरी सहभागी झाले आहेत.
प्लास्टिकचा अतिरेक व वारी मार्गावरील मोठ्याप्रमाणावर वृक्ष नष्ट झाल्याने पर्यावरण संवर्धनाची गरज आहे. वारीमध्ये व्यवस्थेपेक्षा अवस्थेला महत्व आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धक संताचा उपदेश हाती घेत आम्ही निर्मल वारी, हरीत वारी ही संकल्पना सुरू केली आहे. वारकºयांकडून वारीदरम्यान कुठेच कचरा पडणार नाही किंवा पर्यावरणाची हाणी होणार नाही, याची काळजी घेतल्या जाते.
- हभप रविंद्र महाराज हरणे, सोहळा प्रमुख संत मुक्ताबाई पालखी.