बुलडाणा : गेल्या वर्षी मुंबई व पुणे शहरासह सर्वच महानगरांमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला. आता गेल्या काही दिवसांपासून ही परिस्थिती पुन्हा निर्माण होत आहे. यामुळे मुंबई, पुणे ड्युटी नको रे बाबा, अशी विनवणी एसटी बसचे चालक व वाहक करताना दिसून येत आहेत.
कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून तब्बल सहा महिने एसटी बसची प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी होत गेल्याने ऑगस्ट २०२० पासून एसटीची चाके पुन्हा एकदा फिरायला लागली. सुरुवातीला जिल्हांतर्गत वाहतुकीस परवानगी देण्यात आली. यानंतर लांबपल्ल्याच्या ठरावीक बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या. कालांतराने प्रवाशांचा कल वाढल्याने एसटी बसची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली. यामुळे साहजिकच चालक व वाहकांच्या ड्युटी महानगरांपर्यंत धावणाऱ्या शहरांकडे लावण्यात आल्या. सुरुवातीच्या काळात त्यांनी ही जबाबदारी निमूटपणे स्वीकारली. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याने पुणे, मुंबईची ड्युटी म्हटली की नको रे बाबा, असे शब्द आपसूकच एसटी चालक व वाहकांच्या तोंडातून बाहेर पडतात.
.......चौकट..........
परत आल्यानंतर अनेकांना झाला त्रास
पुणे, मुंबईसाठी जिल्ह्यातील सातही आगारांमधून बसेस सोडण्यात येतात. या ठिकाणी जाऊन परत आल्यानंतर अनेक चालक व वाहकांना त्रास झाला आहे. यापैकी काही जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. वेळीच चाचणी करून निदान झाल्यानंतर औषधोपचार घेऊन ते ठणठणीतही झाले आहेत. मात्र अशा प्रकारामुळे आता या शहरांमध्ये जाण्यासाठी चालक व वाहक सहसा धजावत नसल्याचे चित्र आहे.
........प्रतिक्रिया..........
चालक-वाहकांच्या प्रतिक्रिया
पुणे किंवा मुंबई बसफेरीवर आमची ड्युटी लावण्यात येते. अधिकाऱ्यांनी आपल्यावर जबाबदारी सोपविल्यानंतर ती पार पाडावीच लागते. मात्र गेल्या वर्षीचा कोरोना काळातील अनुभव वाईट आहे. यामुळे पुणे, मुंबईला जाण्याची आता भीती वाटू लागली आहे.
मी पुणे, मुंबई बसफेरीवर यापूर्वीही अनेक वेळा ड्युटी केली आहे. आताही या बसफेऱ्यांची जबाबदारी मी स्वीकारत आहे. मात्र सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्वसाधारण परिस्थितीपेक्षा आता ही ड्युटी नकोच अशी भावना आता होत आहे. स्वत:सह परिवारातील सदस्यांनाही धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
.............प्रतिक्रिया..............
एसटी चालक व वाहकांना पुणे, मुंबईची ड्युटी करताना कुटुंबाची काळजी सतावत असते. सध्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना सतत प्रवाशांच्या संपर्कात असल्याने त्यांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता सरकारने एसटी कामगारांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्था करावी व एसटी कर्मचारीबाधित झाल्यास त्यांच्या उपचारांचा खर्च उचलावा.
- प्रदीप गायकी, प्रदेश सचिव, महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना
...................