मेहकर (जि. बुलडाणा): तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील मूग पावसाअभावी करपला असून, मूग उत्पादनात यावर्षी ७0 टक्के घट झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. तालुक्यात मूग काढणीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला असून, यावर्षी शेतकर्यांना मूगाच्या उत्पन्नसाठी लागलेला खर्चही भरून निघत नसल्याचे दिसून येत आहे. यावर्षी खरीप हंगामाच्या सुरूवातीलाच समाधानकारक पाऊस झाल्याने ७0 ते ८0 हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकर्यांनी खरीपाची पेरणी केली होती. गत दहा वर्षापासून सोयाबीनमुळे मुंगाचे उत्पादन घेण्याकडे शेतकर्यांनी पाठ फिरविली होती. परंतू, यावर्षी मृग नक्षत्रातच समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने कित्येक वर्षानंतर मृग नक्षत्रात पेरणी होत असल्याने अनेक शेतकर्यांनी आपल्या शेतात मुंगाचे पीक घेण्यास पसंती दिली. सोयाबीनचे उत्पादन घेणार्या अनेक शेतकर्यांच्या शेतात यावर्षी मूगाचे पीक दिसू लागले. सुरूवातीला झालेल्या पावसावर शेतातील मूगाचे पीक चांगले बहरायला लागले होते. मात्र, पावसाने गतमहिन्यात दीड महिना लंबी दडी मारल्यामुळे अनेक शेतकर्यांच्या शेतातील मूगाचे पीक करपून गेले. तर काहींच्या शेतातील मूगाला शेंगाच धरल्या नाहीत. ओलिताची शेती असलेल्या शेतकर्यांचा थोड्याबहुत प्रमाणात मूग आला परंतू, त्यांनाही मूग पीकाच्या उत्पादनात फटकाच बसला. सद्यस्थीतीत मूग काढणीचा हंगाम शेवटच्या टप्यात असून, मूग उत्पादनात ७0 टक्के घट झाल्याचे दिसून येत आहे. शेतकर्यांना मूगाच्या उत्पादनात झळच सोसावी लागल्याचे दिसत आहे.
मूग उत्पादनात ७0 टक्के घट !
By admin | Published: September 20, 2015 11:35 PM