बुलडाणा : शहरातील विविध प्रभागात काही नागरिकांनी अवैध नळ कनेक्शन घेतले आहेत. नगरपालिकेच्या वतीने शहरात अवैध नळ कनेक्शनची शाेधमाेहिम राबविण्यात आली तसेच १४१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या कराची वसुली करण्यात येणार आहे.
बुलडाणा शहराची शहराची लाेकसंख्या ८० हजाराच्या जवळपास आहे तसेच नगरपालिकेचे २७ वाॅर्ड आहेत. शहराला नगरपालिकेच्या स्वतंत्र पाणीपुरवठा याेजनेच्या माध्यमातून येळगाव धरणातून पाणीपुरवठा हाेताे. शहरात जवळपास १६ हजार मालमत्ता आहेत. यामध्ये खुले भूखंड आणि दुकाने १६०० च्या जवळपास आहेत. नगरपालिकेच्या हद्दीत १४ हजार ५०० घरे आहेत. तसेच १२ हजार नळ कनेक्शन घेतलेले आहेत. काही नागरिकांनी अवैधरीत्या नळ कनेक्शन घेतलेले असल्याने नगरपालिकेच्या वतीने त्यांच्याविरुद्ध माेहीम राबविण्यात आली. नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने अवैध नळ कनेक्शन घेणाऱ्या १४१ नागरिकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून कराची वसुली करण्यात येणार आहे.
१० टक्के पाण्याची गळती
शहराला पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या पाण्याच्या १० टक्के गळती हाेते. यामध्ये पाईपलाईन लिकेज असणे व इतर कारणांनी पाण्याची गळती हाेते. पाणीपुरवठा विभागाच्या वतीने तातडीने पाईपलाईनवरील लिकेज काढण्यात येतात.
काेराेनामुळे करवसुली थकली
काेराेना संसर्ग वाढत असल्याने मार्च महिन्यापासून लाॅकडाऊन करण्यात आले हाेते. त्यामुळे अनेकांचे राेजगार गेले. अनेक जण आर्थिक संकटात सापडले. त्यामुळे नगरपालिकेच्या कर वसुलीला ब्रेक लागला आहे. मार्च महिन्यापयर्यंत कर वसुली करण्याचे आव्हान नगरपालिकेच्या समाेर आहे.