लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : पालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहरातील अतिक्रमणात दिवसेंदिवस भर पडत असताच, आता पालिकेच्या शाळांचा गोदाम म्हणून वापर होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शहरातील सुटाळपुरा भागात नगरपालिकेची शाळा क्रमांक ८ आहे. पटसंख्येच्या अभावामुळे बंद पडलेल्या या शाळेकडे पालिका प्रशानाचा कानाडोळा आहे. या गोष्टीचा फायदा घेत, परिसरातील बिछायत केंद्र संचालकाने या शाळेचा वापर गोदाम म्हणून करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. मात्र, या विरोधात कुणीही आवाज उठवायला तयार नाही. त्यामुळे संबंधित बिछायत केंद्र संचालकाने शाळेच्या दोन खोल्यांमध्ये अतिक्रमण करून त्यात साहित्य भरले आहे. सदर शाळा खोलींचा वापर कोणाच्या परवानगीने होत आहे? याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे सदर बिछायत केंद्र चालकाकडून या ठिकाणीच कार्यक्रम घेण्यात येऊन बंद शाळेचा पुरेपूर उपयोग घेण्यात येत असल्याचे दिसून येते. याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
पालिका इमारतीचा वापर गोदामासाठी!
By admin | Published: July 14, 2017 12:51 AM