- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: स्थानिक नगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छ सर्वेक्षणात सकारात्मक प्रतिसादासाठी एक पत्रक जारी करण्यात आले. यात संभाव्य १२ प्रश्न आणि त्यांची उत्तरे आरोग्य विभागाने लिखित स्वरूपात देत, शहराचा गुणांक वाढविण्यासाठी सहकार्याचे आवाहन केले. या पत्रकामुळे खामगावात एकच खळबळ उडाली असून विरोधी पक्षाने सत्ताधारी अधिकाऱ्यांवर टीकेची झोड उठविली आहे.स्वच्छ सर्वेक्षण-२०२० अंतर्गत केंद्रीय समितीच्यावतीने खामगाव शहराचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आगामी काही दिवसांत या सर्व्हेक्षणाच्या अनुषंगाने खामगाव पालिकेच्या आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यामध्ये शहर स्वच्छता समन्वयाचीही नियुक्ती करण्यात आली आहे. शहराच्या विविध भागातील सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता राखण्यासाठी एक अॅक्शन प्लानही पालिकेच्या आरोग्य विभागाने तयार केला आहे. इतकेच नव्हे तर स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत केंद्रीय समितीद्वारे विचारण्यात येणाºया संभाव्य १२ प्रश्नांचे एक पत्रक शहरात वितरीत करण्यात येत आहे. यामध्ये संभाव्य प्रश्नांची उत्तरे तयार करून देण्यात आली असून स्वच्छ सर्वेक्षणात शहराला जास्तीत जास्त गुण मिळवून देण्यासाठी पालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. पालिकेचा हा प्रयत्न नागरिकांची दिशाभूल करणारा आणि खोटं बोलण्यास प्रोत्साहित करणारा असल्याची टीका विरोधी पक्षाकडून केली जात आहे.
स्वच्छ सर्वेक्षणातंर्गत जनजागृतीचे पालिकेचे प्रयत्न आहेत. संभाव्य प्रश्नावली आणि त्यांची संभाव्य उत्तरे असलेले पत्रक जनजागृतीसाठी वितरीत केले आहे. मात्र, संभाव्य उत्तर देण्यासाठी कोणतेही बंधन तसेच आग्रह धरलेला नाही.- प्राजक्ता पांडेआरोग्य पर्यवेक्षीका, नगर परिषद, खामगाव.शहरात ठिकठिकाणी स्वच्छतेचा बोजवारा वाजलेला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना भावनिक आवाहन करून खोटं बोलण्यासाठी प्रवृत्त करणे योग्य नाही. पालिकेतील अधिकारी सत्ताधारी पक्षाच्या हातचे बाहुले बनल्यानेच अनेक नियमबाह्य प्रकार पालिकेत सुरू आहेत.- सरस्वती खासने स्वीकृत नगरसेविका, काँग्रेस, खामगाव.