- सोहम घाडगे
बुलडाणा : हालचाल करता येत नसणाºया दिव्यांगांना संचारबंदीच्या काळात सुविधा देतांना नगर परिषदांनी हात आखडता घेतल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील १३ पैकी केवळ चार नगर परिषदांनी दिव्यांगांना आर्थिक मदत दिली. जीवनावश्यक कीटचे ११ पालिकांनी वाटप केले तर फक्त ७ नगर परिषदांमध्ये आरोग्य कीट देण्यात आल्याचे आकडेवारी सांगते. कोरोनामुळे देशात लॉकडाउन आहे. उद्योगधंदे, कार्यालये, शाळा, कॉलेज, दुकाने सर्व बंद आहेत. संचारबंदीत कुणालाही विनाकारण घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. अत्यावश्यक सेवा तेवढ्या सुरु ठेवण्यात आल्या. मात्र ज्यांना शरिराची हालचाल करता येत नाही अशा दिव्यांगांनी बाहेर कसे जायचे. त्यामुळे शासनाने हालचाल करता येत नसणाºयांना संचारबंदीत घरपोच सुविधा देण्याचे जाहीर केले. जीवनावश्यक वस्तू, कोरोना विषाणूपासून बचावासाठी आरोग्य कीट, आर्थिक मदतीचा यामध्ये समावेश आहे. नागरी भागातील दिव्यांगांना नगर परिषद मुख्याधिकाºयांच्या माध्यमातून तर ग्रामीण भागात पंचायत समितींच्या माध्यमातून सुविधा देण्यात आल्या. मात्र ही मदत देताना हात आखडल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात ७३ हजार ३६८ दिव्यांग
जिल्ह्यात ७३ हजार ३६८ दिव्यांग असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाकडून मिळाली. परंतू संचारबंदीत पालिकांच्या माध्यमातून हालचाल करता येत नसणाºया १७९२ दिव्यांगांनाच मदत देण्यात आली. सामाजिक न्याय विभाग केवळ ८९२ जीवनावश्यक कीट वाटप करुन मोकळा झाला. इतर दिव्यांग बांधवांना मात्र वाºयावर सोडण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनाही मदतीचा हात दिला असता तर बरे झाले असते.