९ पालिकांची वर्षअखेर संपणार मुदत : प्रभाग रचना करण्याचे निवडणूक आयाेगाचे आदेश
संदीप वानखडे
बुलडाणा : काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याने राज्यभरात अनलाॅक प्रक्रिया राबवण्यात येत आहे़ निर्बंध शिथिल हाेत असताना निवडणुकीची प्रतीक्षा राजकीय पक्षांच्या नेत्याबराेबर नागरिकांनाही हाेती़ निवडणूक आयाेगाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून प्रभाग रचना निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत़ त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत़ जिल्ह्यातील ९ नगरपालिकांची मुदत वर्ष अखेरीस संपणार आहे़
काेराेनाचा फटका निवडणुकांनाही बसला आहे़ त्यामुळे अनेक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत़ सध्या काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यातच निवडणूक आयाेगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगर परिषदा, नगर पंचायतींच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत़ त्यामुळे आता निवडणुकीचे पडघम वाजण्यास प्रारंभ झाला आहे़
जिल्ह्यातील मोताळा व संग्रामपूर नगर पंचायतीची प्रभाग रचना आधीच जाहीर करण्यात आली आहे़, तसेच बुलडाणा, चिखली, मलकापूर, नांदुरा, खामगाव, जळगाव जामोद, शेगाव, मेहकर, देऊळगावराजा या पालिकांची मुदत वर्षाच्या शेवटी संपणार आहे़ त्यामुळे या पालकांसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यास प्रारंभ हाेणार आहे़
एक सदस्यीय प्रभाग पद्धत राहणार
नगर परिषद, नगर पंचायतींमध्ये आता बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी आता एक सदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्यात आली आहे़ त्यामुळे आगामी निवडणुकीत एक सदस्यीय प्रभाग राहणार आहेत़ त्यामुळे या निवडणुकीसाठी आता राजकीय पक्षांना नव्याने व्यूहरचना आखावी लागणार आहे़
१० ग्रामपंचायतींना निवडणुकीची प्रतीक्षा
या वर्षात कार्यकाळ संपत असलेल्या १० ग्रामपंचायतींची प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे़; मात्र निवडणुकीची अद्यापही प्रतीक्षा आहे़ काेराेनामुळे ग्रामपंचायत निवडणुकीही पुढे ढकलण्यात आल्या आहेत़ नगर पालिकांसाठी निवडणूक आयाेगाने आदेश दिल्याने ग्रामपंचायतींच्या निवडणुकांविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे़
कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश
डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या दरम्यान मुदत संपत असलेल्या नगर पंचायत आणि नगरपालिकांची प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश निवडणूक आयाेगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत़ त्यानुसार २४ ऑगस्ट राेजी बैठक हाेणार असून, त्यामध्ये याविषयी निर्णय हाेणार आहे़ २०११ च्या लाेकसंख्येचा आधार घेऊन प्रभार रचना करण्यात येणार आहे़
नगर पंचायतींविषयी संभ्रम
जिल्ह्यातील माेताळा आणि संग्रामपूर नगर पंचायतच्या प्रभाग रचनेचा आराखडा यापूर्वीच तयार करण्यात आला आहे़ त्यामुळे या नगर पंचायतींची पुन्हा प्रभाग रचना हाेणार की नाही, याविषयी संभ्रम आहे़
जिल्ह्यातील एकूण नगरपालिका ११
मुदत संपत असलेल्या नगरपालिका ०९
जिल्ह्यातील नगर पंचायती ०२