बुलडाणा : शहरातील गोरगरीब जनतेचे वीज बिल, नगर पालिकेचा सर्व प्रकारचा कर माफ करून त्यांना ३ महिन्याचे राशन देण्याची मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. तसेच बुलडाणा शहरातील अनेक भागात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. त्या भागात स्वच्छता अभियान राबवण्याची मागणीही निवेदनात केली आहे. कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीत शहरात लॉकडाऊन व संचार बंदी लावण्यात आलेली आहे. त्यामुळे शहरातील उद्योग धंदे हे ठप्प पडलेले असुन यामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. अशातच विद्युत वितरण पारेषण कंपनीच्या वतीने सर्व सामान्य ग्राहकांकडून सक्तीची वीज बिलाची वसुली केली जात आहे. तसेच थकीत वीज पुरवठा हा सुध्दा खंडित केला जात आहे. बुलडाणा नगर परिषदेच्या वतीने सक्तीने कर आकारणी केली जात आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना विजेचे देयक आणि कर भरणा करणे शक्य नाही. त्यामुळेे, गाेरगरीबांचे विजेचे देयक आणि नगर पालिकेचा कर माफ करावा, तसेच तीन महिन्याचे धान्य देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर डाॅ.माेबीन खान अयुब खान, महंमद शिफात शेख असलम, सैय्यद दानिश सैय्यद हमीद, सलीम शहा अफसर शहा आदींसह इतरांची स्वाक्षरी आहे.
वीज देयकांसह नगर पालिकेचा कर माफ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 4:34 AM