- अनिल गवई
खामगाव: महाराष्ट्र राज्य शासनाची अतिशय महत्वाकांक्षी १३ कोटी वृक्ष लागवड मोहिम बुलडाणा जिल्ह्यात प्रतिसादाच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील नगर पालिका आणि नगर पंचायतींची अपेक्षीत उद्दीष्टपूर्तीच्या दिशेने अतिशय संथ गतीने वाटचाल सुरू आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्वच पालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे समोर आले आहे.
शासनाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विविध विभागांमार्फत वृक्ष लागवड केली जाते. नगर पालिका स्तरावरही काही वृक्षांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात येते. त्यानुसार वृक्ष लागवडीसाठी नगर पालिकांना देखील जबाबदारी निश्चित करण्यात आली. मात्र, शासनाच्या निर्देशांना न जुमानता जिल्ह्यातील ११ नगर पालिका आणि २ नगर पंचायतींकडून वृक्ष लागवड मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद दिल्या जात नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वृक्ष लागवड मोहिमेचा कालावधी संपुष्टात येत असतानाही अनेक पालिकांनी वृक्ष लागवडीसाठी खोदून ठेवलेल्या हजारो खड्डयांना वृक्षांची प्रतीक्षा असल्याचे दिसून येते. १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेसाठी २० जुलै ही अंतिम तारीख ठरविण्यात आली असली तरी, जिल्ह्यातील बहुतांश नगर पालिकांमध्ये वृक्ष लागवड मोहिम अतिशय संथ गतीने सुरू असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील सर्वातमोठ्या खामगाव नगर पालिकेसह बुलडाणा, मलकापूर, जळगाव जामोद, चिखली, लोणार, मेहकर, दे. राजा, सिं. राजा आदी नगर पालिकांसह मोताळा आणि संग्रामपूर नगर पंचायतीही वृक्ष लागवड मोहिमेत माघारल्या आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच पालिकांच्या मुख्याधिकाºयांना कारणेदाखवा नोटीस बजावल्या आहेत.
खड्ड्यांना वृक्षांची प्रतिक्षा!
१३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेची पूर्व तयारी म्हणून नगर पालिका आणि पंचायतींनी स्थळांची निश्चितीकरून खड्डे खोदले. मात्र, प्रत्यक्षात जुलै महिना उलटत असतानाही वृक्षांची लागवड केली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील लक्षावधी खड्ड्यांना वृक्षांची प्रतीक्षा असल्याचे दिसून येते. दरम्यान यातील काही खड्डे हे बुजल्याचे देखील निरिक्षण जिल्हास्तरावरून नोंदविण्यात आल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.
पालिकांचे राष्ट्रीय कामांकडे दुर्लक्ष!
१३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील नगर पालिका निहाय वृक्ष लागवडीचे उद्दिष्टे ठरवून देण्यात आले होते. त्या उद्दिष्टानुसार पालिकांची वृक्ष लागवड मोहिम २० जुलै २०१८ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षीत होते. मात्र, खामगाव पालिकेसह जिल्ह्यातील सर्वच पालिकांनी ठरवून दिलेल्या उद्दिष्टानुसार कारवाई केली नाही. त्यामुळे वृक्ष लागवड या राष्ट्रीय कामाकडे दुर्लक्ष केल्याचा ठपकाही संबंधीत पालिकांवर ठेवण्यात आला आहे.
खामगाव पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनाही नोटीस!
जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या खामगाव नगर पालिकेचे मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनाही ही नोटी बजावण्यात आली आहे. यासंबधी तीन दिवसांच्या आत खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्यथा नियमानुसार कारवाई करण्याचा इशाराही या नोटीसमध्ये जिल्हाधिकाºयांनी दिला आहे. खामगावातील ९-१० स्थळांवर अद्यापपर्यंत वृक्ष लागवड मोहिमेस सुरूवात करण्यात आली नसल्याचे समजते.