धामणगाव बढे पोलिसांनी या प्रकरणी तपास करून मृत महिला व संबंधित आरोपीच्या कुटुंबातील व्यक्तींचे जबाब मधल्या काळात नोंदवले होते. त्याच्या आधारावर पोलिसांनी सरकार पक्षातर्फे स्थानिक पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकांनी या प्रकरणी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात उपरोक्त तक्रार नोंदवली आहे. ४ जुलैच्या मध्यरात्री टेंभी येथील एका घरामध्ये चार व्यक्ती विष घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या होत्या. यामध्ये एक महिला, अल्पवयीन मुलगा आणि दोन लहान मुलांचा समावेश होता. दरम्यान त्यांना मलकापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता दुसऱ्या दिवशी यापैकी वृषाली समाधान तायडे (३०) या महिलेचा तसेच अनुभव समाधान तायडे (६) या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. प्रकरणी धामणगाव बढे पोलिसांनी संबंधित व्यक्तींच्या नात्यातील ७ ते ८ जणांचे जबाब नोंदवले होते. दरम्यान, पोलीस चौकशीत प्रकरणातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलानेच हे कृत्य केल्याचे समोर आल्याने पोलिसांनी या प्रकरणातील अल्पवयीन मुलावर दोघांच्या खुनाचा आणि अन्य एका चिमुकल्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ९ जुलै रोजी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे पोलीस उपनिरीक्षक गर्दे यांनीच धामणगाव बढे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार चंद्रकांत ममताबादे हे करीत आहेत.
--
या प्रकरणात पोलिसांनी संबंधित व्यक्तींच्या ७ ते ८ नातेवाइकांचे जबाब नोंदवले आहेत. त्या चौकशीत निष्पन्न झालेल्या काही बाबींच्या आधारावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्यापही आमचा तपास सुरू आहे. त्यामुळे त्याबाबत अद्याप काही बोलणे योग्य ठरणार नाही.
(चंद्रकांत ममताबादे, ठाणेदार, धामणगाव बढे)