लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा/धामणगाव बढे : शेतीच्या वादातून दोन सख्या भावांचा पुतण्याने धारधार शस्त्राने खून केल्याची घटना १२ जून रोजी मोताळा तालुक्यातील सिंदखेड गावात घडली. या घटनेत दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याप्रकरणी रात्री उशिरा धामगाव बढे पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. या घटनेत त्र्यंबक रामलाल मोरे (५५) आणि त्यांचा भाऊ सुभाष रामलाल मोरे या दोघांचा मृत्यू झाला असून सुनील सुभाष मोरे व अनिल तुळशीराम मोरे हे दोघे जखमी झाले आहेत. प्रकरणी आरोपी उमेश गजानन मोरे, त्याचा भाऊ मंगेश मोरे, वडील गजानन मोरेसह उमेशची बहीण व आईलाही अटक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. गुरूवारी मोताळा तालुक्यात पाऊस झाला. त्यामुळे वरील बाजूस शेत असलेल्या आरोपी गजानन मोरे यांनी त्यांच्या शेतातील पाणी दांडाने त्र्यंबक मोरे व सुभाष मोरे यांच्या शेतात काढले होते. त्याचा जाब दुपारी गजानन मोरेला दोघांनी विचारला असता त्यांना गजानन मोरे व त्याच्या मुलांनी धमकावले होते. सोबतच त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न शेतातच केला होता. त्यामुळे लगतच्या नागरिकांनी त्यांचे भांडण सोडवले होते. दरम्यान सायंकाळी त्र्यंबक मोरे, सुभाष मोरे व त्यांचे कुटुंबिय संबंधित प्रकाराचा जाब विचारण्यासाठी गजानन मोरे यांच्या घरी गेले होते. त्यावेळी गजानन मोरे यांच्या मुलाने घरातून धारधार शस्त्र आणून सुभाष मोरे व त्र्यंबक मोरे यांचा खून केला. या घटनेमध्ये झालेल्या हातापायीत सुनील सुभाष मोरे आणि अनिल तुळशीराम मोरे हे दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर बुलडाणा येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. घटनेचे गांभिर्य पाहता जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते, धामणगाव बढे पोलिस ठाण्याचे ठाणेदार ठाकूर व त्यांच्या सहकाºयांनी लगोलग घटनास्थळ गाठून आरोपींना ताब्यात घेतले आहे.
पावसाचे पाणी वादास ठरले कारण
गुरुवारी मोताळा तालुक्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे वरच्या बाजूला असलेले गजानन मोरे यांच्या शेतात असलेले पाणी त्यांनी दांड काढून बाहेर काढले. ते सुभाष मोरे व त्र्यंबक मोरे यांच्या शेतात घुसले. त्यामुळे उभय कुटुंबात वाद झाले. व त्याचे पर्यावसन हे भाऊबंदकीच्या संघर्षात होऊन त्र्यंबक मोरे व सुभाष मोरे यांना जीव गमवावा लागला. दोन्ही मृतक व आरोपी गजानन मोरे हे चुलत भाऊ आहेत. तर प्रकरणातील मुख्य आरोपी उमेश मोरे हा मृतकांचा नात्याने पुतण्या लागत होता.
सायंकाळी घडली घटना
ही खुनाची खळबळ जनक घटना सिंदखेड गावात सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. गजानन मोरे व सुभाष आणि त्र्यंबक मोरे यांच्यामध्ये आधी शेतात वाद झाला होता. त्यावेळी त्र्यंबक आणि सुभाष मोरे दोघेच होते. तेथे त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर गावात आल्यावर या वादाला पुन्हा तोंड फुटले होते.