खामगाव: पूर्व वैमनस्यातून खून केल्याचे सिध्द झाल्याने एका आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. खामगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी गुरूवारी हा महत्वपूर्ण निकाल दिला.
७ मे २०१३ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास गजानन विश्वनाथ काकडे रा. वरवट बकाल याने पिंपळगाव राजा येथे फिर्यादी सुनील प्रकाश राठोड आणि त्यांचे मोठे वडील शिवलाल राठोड यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला. तत्पूर्वी सतत ७-८ दिवसांपासून आरोपी गजानन काकडे हा त्यांच्या घराकडे चकरा मारत होता. दरम्यान, ७ मे रोजी सुनिल राठोड हे संजय मोहन चव्हाण यांच्या घराकडे जात असताना, आरोपीने पाठलाग केला. यावेळी सुनिल राठोड यांचे मोठेबाबा मध्यस्थी करण्यास आले असता आरोपीने आपल्या जवळील चाकू शिवलाल राठोड यांच्या पोटात खुपसला. आणि घटनास्थळावूरन पळून गेला. जखमी अवस्थेत शिवराल राठोड यांना औरंगाबाद येथे भरती करण्यात आले. ८ मे २०१३ रोजी सुनिल प्रकाश राठोड यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात भादंवि कलम ३०७, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, जखमी शिवलाल राठोड यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे पिंपळगाव राजा पोलिसांनी गुन्ह्यात भादंवि कलम ३०२ अन्वये वाढ केली.
तपासाअंती दोषारोप पत्र जिल्हा व सत्र न्यायालय खामगाव येथे दाखल केले. याप्रकरणी १७ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपी विरोधात दोषारोप सिध्द झाल्याने आरोपी गजानन विश्वनाथ काकडे यास भादंवि कलम ३०२ मध्ये आजन्म कारावासाची शिक्षा आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास २ महिने सश्रम कारावास तर कलम ५०६ मध्ये एक वर्ष सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस सश्रम कारवास अशी शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने अतीरिक्त शासकिय अभियोक्ता कु . रजनी बावस्कार (भालेराव) यांनी काम पाहीले..
सदर प्रकरणात वैद्यकिय अधिकारी डॉ. अतुल वनारे,डॉ. विकास राठोड व आरोपीस तपासनारे डॉ.अरूण पानझाडे , तसेच मृतकचे मृत्यूूपुर्व बयान नोंदविणारे नायब तहसिलदार आनंद बोबडे औरंगाबाद आणि साक्षीदार संजय चव्हान , फियार्दी सुनिल ह्याची साक्ष महत्व पूर्ण ठरली.