- ब्रह्मानंद जाधव। बुलडाणा : जिल्ह्यात सध्या ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ अभियान युद्ध पातळीवर राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये कोरोनाची लक्षणे असणाºया व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना तातडीने कोवीड सेंटरमध्ये जमा करण्यात येत आहे. परंतू कोरोनासोबतच दुर्धर आजाराचे रुग्णही यामध्ये समोर येत आहेत. त्यामुळे दुर्धर आजार बरे करण्याचा नवा पेच आता आरोग्य विभागासमोर निर्माण झाला असून, जिल्हा परिषद आरोग्य विभाग मोहीमेची माहिती गोळा करण्यातच व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ अभियान १५ सप्टेंबर पासून सुरू झाले असून, १० आॅक्टोबर पर्यंत राहणार आहे. अभियानांतर्गत जिल्ह्यात २६ लाख ६० हजार ८९७ लोकसंख्येची तपासणी होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात १ हजार ७१८ पथकांकडून ही मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये गंभीर आजार असलेल्या रूग्णांची वेगळी नोंद करण्यात येत आहे. तीव्र श्वसनाचे आजार व फ्लू सदृश्य आजारांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यामध्ये घरोघरी जाऊन लोकांची ताप आणि आॅक्सिजन लेव्हल तपासणी करण्यात येत आहे. संदिग्ध कोरोना रुग्ण शोधणे व उपचारासाठी संदर्भ सेवा देण्यात येणार आहेत. परंतू या मोहिमेमध्ये वेगवेळ्या दुर्धर आजाराचे रुग्ण सापडत आहेत. त्यांमध्ये मधुमेह, हृदयविकार, किडनी विकार, कँसन, क्षयरुग्ण यासारखे आजार असणारे रुग्ण समोर येत आहेत. परंतू त्यांना उपचाराचा सल्ला देऊन सोडून देण्यात येत आहे. हे आजार बरे करण्याचे मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर निर्माण होत आहे. अनेक जुनाट आजार समोर आल्यानंतर आशा, व सर्वे करणारे इतर कर्मचारी आपल्या अहवालावर नोंद करून पुढचे घर घेत आहेत.
‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ अभियानातून दूर्धर आजाराचे रुग्ण सापडत आहेत. त्या सर्व रुग्णांची माहिती सध्या एक त्र करण्यात येत आहे. - बाळकृष्ण कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी.बुलडाणा.