लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यास १४ आॅक्टोबर पासून प्रारंभ होत असून या दुसऱ्या टप्प्यात प्रामुख्याने दुर्धर आजार असणारे, सारी आणि आयएलएमचा आजार असणाऱ्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे.या व्यतिरिक्त स्थलांतरीत झालेले, तथा पहिल्या टप्प्यात बाहेरगावी असलेल्या आणि प्रत्यक्ष तपासणीसाठी नकार देणाऱ्यांची प्राधान्याने तपासणी करून त्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. १४ ते २४ आॅक्टोबर या कालावधीत हे दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २६ लाख ६० हजार नागरिकांचे सर्वेक्षण आरोग्य विभागाच्या पथकाने केले होते. त्यात प्रामुख्याने अॅक्युट रेस्पीरेटरी इन्फेक्शन (सारी) आणि इन्फ्युएनजा लाइक इन्फेक्शनचे (आयएलएम)च्या रुग्णांचा शोध घेण्यात आला होता. तसेच ताप, आॅक्सीजनचे प्रमाण शरीरात कमी असणे आणि दुर्धर आजार यापैकी किमान दोन लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तींना थेट फिव्हर क्लिनीकमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान आता दुसऱ्या टप्प्यात प्रामुख्याने दुर्धर आजार असलेल्या तथा १५ सप्टेंबर ते १० आॅक्टोबर दरम्यान संदिग्ध वाटलेल्यांचीही विचारपूस करण्यात येणार आहे.
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ : दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणास आजपासून प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 11:37 AM