सध्या कोरोनाचा कहर वाढतच आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोना फैलावत असल्याने बाधितांची संख्या वाढत आहे. ग्रामपंचायत, आरोग्य यंत्रणा काम करीत आहे. मात्र आपले गाव सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व मंडळींनी सहकार्य करावे तरच लवकर गाव कोरोनामुक्त होईल. त्याकरिता ‘माझे गाव, कोरोनामुक्त गाव’ अभियान यशस्वीपणे राबवावे, असे आवाहन या वेळी आ. संजय रायमुलकर यांनी केले. या अभियानात ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती समिती, बचत गट, तरुण मंडळी, सामाजिक संस्था, पोलीस पाटील, शाळा समिती, ग्राम दक्षता समितीसह गावासाठी धडाडीने पुढे येणाऱ्या मंडळींनी एकत्रितपणे काम करायचे. या मंडळींनी मास्कचा वापर, सामाजिक अंतर, विनाकारण न फिरणे, लग्न समारंभ उपस्थिती, नागरिकांचे आजारपण, लक्षणे असणाऱ्या नागरिकांचे शाळेत विलगीकरण, कोविड टेस्ट, लसीकरण आदी कोविड प्रतिबंधक उपाययोजनांकरिता काम करायचे आहे. हे सर्व गावकऱ्यांनी काळजीपूर्वक केल्यास आपले गाव लवकर कोरोनामुक्त होईल. तेव्हा अभियानात सहभागी व्हा, असे आवाहन सभापती दिलीप देशमुख यांनी केले. तर शेवटी गटविकास अधिकारी आशिष पवार यांनी अभियानासंदर्भात माहिती दिली. या सभेला जि. प. सदस्य संतोष चनखोरे, विस्तार अधिकारी शिवाजी गवई, प्रवीण सोनुने, जे.जे. आरु, गटशिक्षणाधिकारी मधुकर वानखेडे, नैसर्गिक आपत्ती विभागाचे राम नवघरे, स्वीय साहाय्यक रूपेश गणात्रा उपस्थित होते.
‘माझे गाव-कोरोनामुक्त गाव’ अभियान राबवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:37 AM