दुसरबीड : सिंदखेडराजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेड अंतर्गत होत असलेल्या मका खरेदीमध्ये शेतकऱ्यांना वेठीस धरल्या जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहेत. शेतकऱ्यांना वेठीस धरू नये, अशी मागणी शिवसेने केली आहे. यासंदर्भात तालुका प्रमुख शिवप्रसाद ठाकरे, गजेंद्र देशमुख व किनगावराजा युवासेना विभाग प्रमुख लखन देशमुख यांनी सहाय्यक निबंधक व तहसीलदारांना निवेदन देऊन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये नाफेड अंतर्गत मूग, उडीद, सोयाबीन व तुरीची खरेदी केली जाते. यावेळी पोती (बारदाना) मागणी होत नाही. सध्या मक्याची ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. तालुक्यात ताडशिवणी येथे मक्याचे सर्वाधिक उत्पादन होते. इतरही गावातून मका विक्रीसाठी येतो. या वेळी मका आणण्यासाठी काळ्या धारीच्या पोत्यामध्ये ५० किलोचाच कट्टा आणावा, अशी सक्ती करण्यात येत आहे. याकरीता शेतकऱ्यांना एक क्विंटलसाठी २ पोते लागत असल्याने ६० रुपये मोजावे लागत आहेत. शेतकऱ्यास २५ क्विंटल मका आणावयचा असल्यास १५०० रुपये तोटा किंवा भूर्दंड सोसावा लागतो. कोरोना महामारी, अवकाळी नैसर्गिक संकटे व आर्थिक बिकट परिस्थितीमुळे अगोदरच शेतकऱ्यांची मानसिकता भयावह असताना स्वत:च्या कष्टाने कमविलेल्या मालाची विक्री करताना बारदाना शेतकऱ्यांनीच पुरविण्याची अट जाचक असून या जाचक अटीतून व भूर्दंड यातून शेतकऱ्याची मुक्तता करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.