- नारायण सावतकार वरवट बकाल : येथील ग्रामस्थ व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत नागेश्वर महाराज यांची पुण्यतिथी आज ७ एप्रिल रोजी हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात पुण्यतिथी निमित्ताने विविध कार्यक्रम पार पार पडले. यावेळी हजारो भाविक भक्तांनी भाकरी, उडदाचे वरण व शिरा असा महाप्रसाद वाटप करण्यात आला. या उत्सवामुळे गावात मंगलमय वातावरण पसरले होते.संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील सातपुड्याच्या पायथ्याशी सातलवन नदी परिसरातील निसर्गरम्य वातावरणात श्री संत नागेश्वर महाराज यांचे नक्षीकाम केलेले भव्य असे मंदिर आहे. गुडीपडव्याच्या शुभ पर्वावर नागेश्वर महाराजांची पुण्यतिथी व दुसऱ्या दिवशी यात्रौत्सव साजरा करण्यात येतो. यंदाही ग्रामस्थ व भाविकांच्या वतीने पुण्यतिथी व यात्रौत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. पुण्यतिथी निमित्त महाराजांचे दर्शन घेण्यासाठी पंचकोशीतील भाविकांनी एकच गर्दी केली होती.
यंदा भाविकांसाठी ३५ क्विंटल ज्वारीच्या भाकरी, ५ क्विंटल उडदाची डाळ, दीड क्विंटल साहित्याचा शिरा व अंबाडीची भाजीचा भंडारा आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण गावातील घरांमध्ये ज्वारीचे पीठ देऊन भाकरी तयार करण्यात येतात. व त्या भाकरी ट्रॅकटर द्वारे मंदिरात नेऊन महाप्रसादाचे वितरण करण्यात येते विशेष आजच्या दिवशी गावातील एकाही घरात चूल पेटत नाही.