बुलढाणा: येथील सहकार विद्यामंदिराच्या सभागृहात सुरू असलेल्या १७ वर्षाखालील राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेमध्ये १५ एप्रिल रोजी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी चौथ्या फेरीअखेर नागपूरचा १७२७ मानांकन असलेला दिशांक बजाज आणि १४९५ मानांक असलेली छत्रपती संभाजीनगरची सानी देशपांडे आघाडीवर होत्या. त्यांच्यासोबतच पुण्याचा प्रथमेश शेरला, मुंबईचा योहान बोरीच्या आणि मुलीमध्ये श्रुती काळे, ठाण्याची सानंदी भट ,अकोल्याची संस्कृती वानखडे यांनीही चमकदार कामगिरी केली आहे.
१४ एप्रिल रोजी तिसऱ्या फेरीअखेर आघाडीवर असलेल्या सानी देशपांडे व ठाण्याच्या सानंदी भट यांचा चौथ्या फेरीत थेट सामान झाला. सेंटर काऊंटर पद्धीतीने त्यांच्याती लढत सुरू झाली. दोघीही तुल्यबळ असल्याने परस्पराविरोधात असलेले आक्रमण तितक्याच चपळतेने दोघी थोपवून धरत होत्या. त्यामुळे दोघींनीही बरोबरीचा प्रस्ताव मान्य केला. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरची श्रुती काळे व भूमिका वाघले यांच्यात गायको पियानो क्लोज पद्धतीने डावाची सुरू झाली. भूमिकाची एफ ६ ही चाल डावाला कलाटणी देणारी ठरली. त्यात किंचीत वरचढ स्थितीत असलेल्या श्रुतीने आपला अनुभव पणास लावत ६४ चालीपर्यंत रंगलेल्या या डावात विजय मिळविला.मुलांच्या पहिल्या पटावर प्रथम मानांकित नागपूरच्या आरुष चित्रे व मुंबईच्या सुमील गोगटे यांच्यातील सामना ५४ चालीनंतर बरोबरीत ठेवण्यात सोमिलला यश आले. पांढऱ्या सोंगट्या घेऊन खेळणाऱ्या सोमिलला त्याने रोखण्यात यश मिळविले.
मुलांमध्ये चौथ्या फेरीत तिसऱ्या पटावर दिशांक बजाज (नागपूर) आणि छत्रपती संभाजी नगरचा सुदीप पाटील यांच्यात सामना रंगला. सिसिलियन प्रकाराने त्यांच्या डावाची सुरूवात झाली. चौथ्या चालीनंतर सुदीपचे डी६ घरातले प्यादे मागे राहिले. बाराव्या चालीदरम्यान जी४ घरात घोड्याचे बलिदान देणे ही खेळी सुदीपला फायद्याची ठरली. बलिदानाचा फटका दिशांकला बसला परंतु उंटाची एच२ ही खेळी सुदीप ने पाहिली नाही आणि एच५ मधील प्याद्याने ८४ मधील प्यादे घेतले आणि विजयाची संधी गमावली. त्यासोबतच दिशांकने डावावर वर्चस्व बनवत २० व्या चालीला डाव खिशात घातला.
दरम्यान चौथ्या फेरीतील लढती पहाण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहूल बोंद्रे, एआयसीसीचे सचिव हर्षवधन सपकाळ, बुलढाणा अर्बनचे डॉ. सुकेश झंवर, अंकूश रक्ताडे, हेमेंद्र पटेल व प्रवीण पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. १६ एप्रिल रोजी या स्पर्धेचा समारोप होत आहे.