चिखली : येथील तालुका क्रीडा संकुलास शहीद कैलास भारत पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर सैन्यदल व पोलीस आदी भरतींचा सरावासाठी अनेक तरुण नियमितपणे येत असतात. त्याच मैदानात सराव करून शहीद कैलास पवार सैन्यदलात दाखल होते. दरम्यान, देशसेवेदरम्यान वीरमरण आल्यानंतर त्यांच्यावर याच मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यामुळे शहीद कैलास पवार यांची प्रेरणा युवकांना मिळत राहावी व त्यांचा बलिदानाच्या स्मृती कायम राहण्यासाठी तालुका क्रीडा संकुलाचे शहीद कैलास भारत पवार क्रीडा संकुल चिखली, असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारींकडे केली आहे. सदरचे निवेदन तहसीलदारांमार्फत देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष संजय धुरंधर, शहराध्यक्ष बाळू भिसे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सुरडकर यांच्यासह इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.