स्थानिक तहसील कार्यालय अंतर्गत १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर छायाचित्र मतदार याद्याचा संक्षिप्त कार्यक्रम ऑक्टोबर २०२० पासून राबविण्यात येत आहे. यासंदर्भात तालुक्यातील जवळपास सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे ५ हजार १६० छायाचित्र नसलेल्या मतदारांच्या याद्या देण्यात आलेल्या आहेत. त्या मतदारांचे छायाचित्र गोळा करण्याबाबत संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना सूचीत करून संबंधित तलाठी कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी संबंधित मतदारांना नोटीस देऊन त्यांचे रंगीत छायाचित्र तत्काळ त्यांच्याकडे जमा करण्याबाबत कळविले आहे. परंतु, तालुक्यातील पाच हजार १६० छायाचित्र नसलेल्या मतदारांपैकी ३४१ मतदारांचे छायाचित्र संबंधित मतदान
केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत तहसील कार्यालयास प्राप्त झाले आहेत. उर्वरित ४ हजार ८१९ मतदार स्थलांतरित, मयत, दुबार असल्याकारणाने संबंधित यादी भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक व तलाठी यांच्यामार्फत संबंधित मतदाराला यादीभागातून वगळणी करण्याबाबतचा पंचनामा करण्यात आला आहे. तालुक्यातील ४ हजार ८१९ मतदार मतदार यादीतून वगळणी करण्याबाबत निवडणूक आयोगास परवानगी मागण्याबाबतची कार्यवाही तहसील स्तरावरून सुरू आहे.
तालुक्यातील छायाचित्र नसलेल्या मतदारांचे नाव मतदार यादीतून कमी करावयाचे नसल्यास सात दिवसांच्या आत त्यांच्या यादीभागाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याशी संपर्क करून किवा हरकत घेऊन मतदार यादीत नाव ठेवण्याबाबत पूर्वकल्पना द्यावी. विहीत वेळेत संबंधित मतदारांकडून हरकत प्राप्त न झाल्यास त्यांचे नाव संबंधित मतदार यादीतून कमी करण्याबाबतचा प्रस्ताव निवडणूक आयोगास सादर करण्यात येणार आहे. याबाबत सात दिवसांनंतर संबंधित मतदाराकडून छायाचित्र प्राप्त न झाल्यास नाव कमी होणार आहे.
समाधान सोनवणे, तहसीलदार मोताळा.