लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: वारंवार सुचना तथा गृहभेटी देऊनही जिल्ह्यातील ५३ हजार २२५ मतदारांपैकी ४४ हजार ६४६ मतदारांनी त्यांची छायाचित्र मतदार यादीसाठी निवडणूक विभागाकडे न दिल्यामुळे अशा मतदारांना स्थलांतरीत समजून त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहे.त्यामुळे १५ जानेवारी २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या २० लाख ५४ हजार ३८४ मतदारांच्या अंतिम यादीतून ही नावे निघणार आहे. दरम्यान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी केलेले आवाहन आणि काही गृहभेटी दिल्यानतंर ८ हजार ५१४ मतदारांनी त्यांचे छायाचित्र मतदार यादीसाठी दिल्याने ते थोडक्यात बचावले आहे. दरम्यान ही ४४ हजार ६४६ नावे आता वगळण्यात आल्यामुळे आगामी पालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे एकट्या बुलडाणा विधानसभा मतदार संघातील तब्बल १७ हजार ९३९ मतदारांची नावे यामधून वगळल्या गेली आहेत. त्याचा सर्वच राजकीय पक्षांना येत्या काळात फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एस. रामामुर्ती यांच्या निर्देशानुसार तत्कालीन निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे, भूषण अहिरे यांनी तसेच उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यांनी हे कामकाज केले. एक प्रकारे संबंधित ४६ हजार ६४६ जणांना स्थलांतरीत गृहीत धरून त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आलेली आहेत. येत्या काळात पालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. मात्र आता ही नावे वगळल्यामुळे स्थानिक राजकारणावरही याचे काही विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वारंवार सांगूनही अनेकांनी त्यांची छायाचित्रे दिली नव्हती.
मतदार यादीतून ४४ हजार नागरिकांची नावे वगळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2021 10:42 AM