बुलडाणा : मतदार यादीमध्ये बोगस मतदारांना आळा बसण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदार आधार क्रमांक संलग्नीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार १ मार्च ते ३१ जुलै २0१५ दरम्यान जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. आयोगाने आधार क्रमांक संलग्नीकरण करण्यासाठी विविध पर्याय ठेवले आहे. एसएमएस, निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ, मतदान केंद्रावर विहीत नमुन्यात भरून द्यावयाचे प्रपत्र आदींच्या माध्यमातून आधार क्रमांकाचे संलग्नीकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी केले. मतदार आधार संलग्नीकरणाच्या मोहिमेसंदर्भात १६ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी टाकसाळे, उपजिल्हाधिकारी रमेश घेवंदे आदी उपस्थित होते. ज्या नागरिकांनी आधार कार्ड अद्यापही काढले नाही, त्यांनी त्वरित काढून आपल्या मतदार ओळखपत्रासह आधार संलग्नीकरण करण्याचे सांगितले. जिल्ह्यात ६५ आधार कार्ड काढण्याचे संयंत्र कार्यरत आहेत. या संयंत्राद्वारे आधार क्रमांक त्वरित प्राप्त करून घ्यावा. ही सेवा संपूर्णत: नि:शुल्क आहे. यासाठी कुणी रकमेची मागणी करीत असल्यास त्याची तक्रार संबंधित तहसीलदार, पोलीस स्टेशनला करावी. जिल्ह्यात एकूण पुरुष मतदार ९ लाख ९0 हजार २२५ असून, स्त्री मतदार ८ लाख ८६ हजार २४५ आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण १८ लाख ७६ हजार ४७४ मतदार आहेत. आधार क्रमांक व मतदार ओळखपत्र क्रमांक संलग्नीकरणासाठी १२ एप्रिल २0१५ रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, यासाठी संलग्नीकरणाची जनजागृतीची मोहीम ३१ जुलै २0१५ पर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यात येणार्या काळात ५२९ ग्रा.पं. निवडणुका होणार आहेत. यासाठी संलग्नीकरण झालेल्या मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
मतदारांनी नावे आधार क्रमांकाशी संलग्न करावे- जिल्हाधिकारी
By admin | Published: March 17, 2015 1:04 AM