लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : शहर प्रतिबंधीत गुटखा विक्रीचे केंद्र बनले असल्याचे दिूसन येत आहे. शहरातून नागपूर, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, अकोला व इतर जिल्ह्यात येथून गुटका विक्री होत आहे. यामुळे नांदुरा शहर गुटखा विक्रीसाठी मोठी बाजारपेठ असल्याचे दिसून येत आहे. या माध्यमातून दररोज ४ ते ५ लाख रूपयाची उलाढाल होत आहे. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने प्रतिबंधीत गुटका विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांचे मनोबल उंचावले आहे.नांदुरा शहरात मध्यप्रदेश व इतर प्रांतातून ट्रकव्दारे छुप्या मार्गाने प्रतिबंधीत गुटका मोठ्या प्रमाणावर येतो. यानंतर येथे छोटे-छोटे पॅक तयार करून नांदुरा शहरातील विक्रेत्यांकडे ते पोहचवले जाते. बाहेरगावला बस किंवा खासगी वाहनांद्वारे गुटखा पाठविला जातो. विशेष म्हणजे अशा वाहनांची तपासणी सुध्दा होत नाही. एखादे वाहन पकडल्यास, आर्थिक देवाण घेवाण करून ते सोडले जातो. त्यामुळे याचा मागमूसही कोणाला लागत नाही.नांदुरा शहरात विदर्भातील अनेक विक्रेते स्पेशल वाहनातून येतात. प्रतिबंधीत गुटखा घेवून जातात. राज्य शासनाने जेव्हापासून गुटखा विक्रीवर बंदी आणली, तेव्हा काही दिवस गुटखा बंद राहिला. परंतु आता या प्रतिबंधीत गुटक्याची बिनधास्त खरेदी-विक्री सुरू आहे. विदर्भात कोणत्याही दुकानात नांदुºयाचा गुटखा मिळतो.विशेष म्हणजे बनावट गुटखा तयार करण्याचे प्रकारही वाढले आहेत. यामुळे गुटखा खाणाऱ्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. या व्यवसायात प्रचंड नफा असल्याने नांदुरा शहरातील होलसेल गुटखा विक्रेते नागरीकांच्या जिवाशी खेळत आहेत. प्रतिबंधीत गुटखा विक्री करणाºयांवर अन्न व औषध प्रशासनाने कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
अन्न, औषध प्रशासन व स्थानिक पोलीस मिळून संयुक्त कारवाई करण्यात येते. मी स्वत: व आणखी एक असे दोनच कर्मचारी आहोत. त्यामुळे जिल्ह्यात कारवाई करताना खुपच तारांबळ उडते. तरीही कुठे प्रतिबंधीत गुटका विक्री सुरू असेल, तर त्यांच्यावर कडक कारवाई करू.- आर.आर.चौधरी,अन्न व औषध प्रशासन अधिकारी, बुलडाणा.