नांदुरा पंचायत समिती सभापतीसह सदस्यांनी ‘हाता’त घेतले ‘कमळ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 06:09 PM2019-02-22T18:09:04+5:302019-02-22T18:12:20+5:30
नांदुरा पंचायत समिती सभापती अर्चना शिवाजीराव पाटील व पंचायत समिती सदस्या योगिता संदीप गावंडे यांनी मुंबईत मुख़्यमंत्र्यांची भेट घेवून हातात कमळ घेतले आहे.
- योगेश फरपट
लोकमत न्युज नेटवर्क
खामगाव :पक्षांतर्गत वाद शिगेला गेल्याचा फटका मलकापूर मतदारसंघात काँग्रेस पक्षाला बसत असल्याचे दिसून येते. दोन दिवसापूर्वीच नांदुरा पंचायत समिती सभापती अर्चना शिवाजीराव पाटील व पंचायत समिती सदस्या योगिता संदीप गावंडे यांनी मुंबईत मुख़्यमंत्र्यांची भेट घेवून हातात कमळ घेतले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूकीपूर्वीच काँग्रेससमोर आव्हान उभे राहीले आहे.
लोकसभा निवडणूकीची त्सुनामी येण्यापूर्वीच नांदुरा तालुक्यातील राजकारण ‘बदला’ने ढवळून निघत असल्याचे दिसते. मलकापूर मतदार संघात नांदुरा व मलकापूर तालुक्यातील अनेक गावांचा समावेश होतो. भाजपचे आमदार चैनसुख संचेती यांनी या मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजयश्री खेचून आणला आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत स्वत:च्या विजयश्री खेचून आणण्यासोबतच लोकसभा निवडणूकीत युतीच्या उमेदवाराला विजयश्री मिळवून देण्यासाठी त्यांनी दंड थोपाटल्याचे दिसून येते. मतदारसंघातील इतर पक्षाच्या नाराजांशी संपर्क साधून मतदारसंघ आणखी बळकट करण्यावर त्यांचे प्रयत्न असल्याचे दिसून येते. मलकापूर मतदारसंघात काँग्रेस, भाजप सोबत नांदुरा शहरात नगर विकास आघाडीचे प्राबल्य आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदेतील राजकारणामध्ये भाजपचा वरचष्मा ठेवण्यासाठी स्थानिक नेतृत्व सातत्याने प्रयत्नशील राहते. काही महिन्यापूर्वीच नांदुरा नगर विकास आघाडी भगदाड पाडून संचेतींनी आपले राजकीय राजकीय प्राबल्य सिद्ध केले. नांदुरा नगराध्यक्ष रजनी अनिल जवरे यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणला. नांदुरा शहरातील ही राजकीय घटना ताजी असतांनाच गेल्याच आठवड्यात त्यांनी नांदुरा पंचायत समितीच्या सभापती अर्चना शिवाजीराव पाटील व पंचायत समिती सदस्या योगिता संदीप गावंडे पाटील यांनाा भाजपाच्या गळाला लावले आहे. इतकेच नव्हेतर दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सभापती अर्चना पाटील व सदस्या योगिता गावंडे पाटील यांचा प्रवेश मुंबईत घडवून आणला. यामध्ये आमदार चैनसुख संचेती यांची राजकीय परिपक्वता दिसून येत असली तरी काँग्रेसमधील वाढता असंतोष हे या राजकीय घडामोडीमागील प्रमुख कारण असल्याची चर्चा मतदारसंघात आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भगवान धांडे यांच्या आत्मकेंद्री राजकारणामुळे गेल्या काही महिन्यापासून काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे वास्तव आहे. गेल्या काही दिवसापासून काँग्रेसमधील तणाव वाढीला लागला आहे. पंचायत समिती नांदुरा येथे वेगवान राजकीय घडामोडी घडल्याचे दिसून येते. राजकीय वर्चस्वाच्या लढाईत काँग्रेसच्या सभापतींसह सदस्यांनी धांडे गटाला चारीमुंड्या चित करण्यासाठी परस्पर विरोधी विचारधारेच्या राजकीय पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाशी हातमिळवणी करीत ‘बदला’साठी सज्ज झाल्याचे दिसून येते. भाजपप्रवेशाबाबत नांदुरा पंचायत समिती सभापती अर्चना पाटील व सदस्या योगिता गावंडे पाटील यांनी काँग्रेसमधील व्यक्तीकेंद्रीत राजकारणामुळे पक्ष त्याग केल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
नांदुरा पंचायत समिती सभापती अर्चना शिवाजीराव पाटील व काही सदस्यांच्या पक्षाविरोधात हालचाली सुरु होत्या. त्याकडे आम्ही लक्ष ठेवून होतो. तशा तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या. त्यांना भिती होती की, पक्षातून एक दिवस आपल्याला काढल्या जाईल अशी भिती त्यांना होती. त्यामुळे त्यांनी स्वत:हून पक्ष सोडला आहे.
- राहूल बोंद्रे, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, बुलडाणा