लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : येथील राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या जुन्या बसस्थानकावरील हॉटेल दीपक या उपाहारगृहातील एलपीजी गॅस सिलिंडरने ६ फेब्रुवारीला संध्याकाळी चार वाजेदरम्यान अचानक पेट घेतला; मात्र वेळीच त्या उपाहारगृहातील कर्मचारी व महालक्ष्मी गॅस एजन्सीचे कर्मचारी यांनी धाव घेत आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला.
हॉटेल दीपक येथील एलपीजी गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतल्याने त्यावर उपाहारगृहात उपस्थित असलेले ग्राहक व कर्मचारी यांची धावपळ सुरू झाली. याची माहिती मिळताच गॅस एजन्सीचे मालक गौरव पाटील व त्यांच्या कर्मचार्यांनी तेथे धाव घेत उपाहारगृहातील कर्मचार्यांच्या सहकार्याने हे पेट घेतलेले सिलिंडर विझविले. तब्बल पाच मिनिटांनंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. उपाहारगृह राष्ट्रीय महामार्गाला लागून असल्याने महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. दरम्यानच्याच काळात महामार्गावरून गॅसने भरलेले मोठे टँकर जात होते; मात्र या घटनेची माहिती मिळताच ते टँकरचालकाने बाजार समितीच्या आवारात उभे केले होते. नंतर पोलिसांनी वाहतूक पूर्ववत सुरू केली.