नांदुरा( जि. बुलढाणा) : नांदुरा अर्बन बँकेच्या एका कर्मचाऱ्याने इतर कर्मचाऱ्यांच्या साह्याने ऑनलाइन पद्धतीने पाच कोटी ४५ लाख रुपये अपहार केल्याची प्राथमिक माहिती असून, अधिक चौकशी सुरू आहे. हा आकडा आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. रक्कम विविध खात्यात ऑनलाइन ट्रान्सफर करण्यात आली. याबाबत बँक व्यवस्थापक राजेंद्रकुमार पांडे यांनी पोलिसात तक्रार दिली, त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
नांदुरा अर्बन बँक व्यवस्थापक राजेंद्र कुमार पांडे यांनी नांदुरा पोलिसात तक्रार दिली. त्यामध्ये प्रतीक शर्मा हा बँकेचा संगणक लिपिक असून, तो ऑनलाइन डिजिटल व्यवहार सांभाळतो. त्याने पाच कोटी ४५ लाख रुपयांची रक्कम इतर खात्यात ट्रान्सफर केली आहे. या अगोदर कर्मचाऱ्याला नोटीस देऊन याबाबत जाब विचारण्यात आला. त्याने कोणतेही उत्तर न देता बँकेत गैरहजर राहत आहे. त्यामुळे शेवटी पोलिसात तक्रार देण्यात आली. याबाबत नांदुरी अर्बन बँकेचे अध्यक्ष चंपालाल झवर, उपाध्यक्ष दत्ताभाऊ सुपे, बँक व्यवस्थापक राजेंद्र कुमार पांडे यांनी हा प्रकार कर्मचाऱ्यांनी केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे म्हटले. तसेच कर्मचाऱ्यांवर बँकेच्या नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. ठेवीदारांचा पैसा सुरक्षित असून, त्यांनी कोणतीही काळजी करू नये, असे आवाहनही अध्यक्ष झवर, उपाध्यक्ष सुपे यांनी केले आहे.