लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर: भरधाव ट्रकने आधी मालवाहू मिनी ट्रक त्यानंतर मलकापूर एमआयडीसी पोलीस व्हॅनला जबरदस्त धडक दिल्याने दोघे ठार तर पाच जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग ६ वर रसोया प्रोटिन्स कंपनीजवळ मंगळवारी दुपारी १.३0 वाजता घडली. या अपघातामध्ये ठार झालेल्यात सय्यद अन्वर वझीर (३८, रा. पारपेठ) आणि नशीर खा बशीर खा (३२, रा. हाश्मीनगर) यांचा समावेश आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरून मुंबईवरून नागपूरकडे भरधाव जाणारा ट्रकच्या (क्र. डब्ल्यूबी २३-डी१७५५) चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने आधी रसेया प्रोटिन्सनजीक दीड वाजेच्या सुमारास विरुद्ध दिशेने येणार्या मालवाहू मिनी ट्रकला जबर धडक दिली. तर काही अंतरावरच एमआयडीसी पोलीस व्हॅनला (क्र.एमएच२८-सी६४५८) धडक दिली. अपघातात ट्रकसहित व्हॅनदेखील उलटली. या अपघातात गंभीर जखमींपैकी सैय्यद अन्वर वझीर (वय ३८, रा. पारपेठ मलकापूर) याचा उपचारादरम्यान उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. गंभीर जखमीमध्ये रहेमानभाई कुरेशी (वय ५५ रा. पारपेठ) यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना जळगाव खान्देश येथे हलविण्यात आले. पोलीस व्हॅन चालक सुरेशसिंह राजपूत (वय ५२), सैय्यद गफुर सय्यद अयाज (वय २५), शे. सईद शे. हसन (वय ३२), रईसखान युसुफखान (वय ३0) यांचा समावेश आहे. त्यापैकी दोघांवर कोलते तर दोघांवर चोपडे हॉस्पिटलात उपचार सुरू आहेत. गंभीररीत्या जखमी नशिरखा बशीरखा (वय ३२, रा.हाश्मीनगर मलकापूर) यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते; मात्र त्याची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना जळगाव खान्देश येथे हलविण्यात आले असता दुपारी ४.३0 वाजेच्या सुमारास मुक्ताईनगरनजीक त्यांची प्राणज्योत मालवली. अन्वरखा रसिदखा (वय ३0) यांचीसुद्धा प्रकृती गंभिर आहे. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा नियोजन समिती सदस्य राजेंद्र वाडेकर यांनी तत्काळ मदत वाहन बोलावून घेतले व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. महामार्गावरील खड्डय़ांमुळे होणार्या अपघातात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
उपचारासाठी नेतानाच एकाचा मृत्यू राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या अपघातात गंभीररीत्या जखमी नशिरखा बशीरखा (वय ३२) रा. हाश्मी नगर मलकापूर यांना खासगीत उपचार घेत असताना प्रकृती अत्यावस्थ झाल्याने जळगाव खान्देश येथे हलविण्यात आले; मात्र वाटेतच दुपारी ४.३0 वाजेच्या सुमारास मुक्ताईनगरनजीक त्यांची प्राणज्योत मालवली. तर जखमीत अन्वरखा रसिदखा (वय ३0) यांची भर पडली आहे.
पुन्हा एकदा खड्डे चर्चेतराष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाची प्रक्रिया थंड बस्त्यात आहेत. रस्त्यावर खड्डे पडले आहेत. पुन्हा एकदा खड्डय़ांमुळे अपघात घडला आहे. आणखी किती बळी घेणार, हा सवाल घटनास्थळी उपस्थित झाला आहे.